‘तेरी जुबान कतरना बहुत जरुरी है…’,अमोल मिटकरींचा चंद्रकात पाटलांवर निशाणा
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांच्या शायरीद्वारे चंद्रकांत पाटील यांना निशाणा साधलाय दिलं आहे. तेरी जुबान कतरना बहुत जरुरी है… ‘तुझे मर्ज है की तू बार-बार बोलता है!’ अशा शब्दात मिटकरी यांनी पाटलांवर टीका केलीय. शरद पवार हे जेव्हा संसदेत होते. त्यावेळी हे महाशय चड्डी आणि टोपीत होते, अशी टीकाही मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर केलीय.
दरम्यान, सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होते की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथे यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.
यांची डोकी ठिकाणावर आहेत का? – संजय राऊत
‘महाराष्ट्र भाजपचे एक नेते शरद पवारांचा उल्लेख अरे-तुरे, एकेरी भाषेत करीत होते, ही राज्याची परंपरा नाही. आम्ही मोदी साहेबांचा उल्लेख किंवा अमित शाह यांच्याविषयी कधी असे बोलत नाही. अटलजी आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत. आडवाणी यांना आजही मानतो. आपल्यापेक्षा वय, अनुभव आणि विचारांनी मोठे असलेल्यांचा कायम आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी करावी आणि पराभव करावा हे आम्हाला महाराष्ट्राने शिकवले आहे. तुम्ही काल राजकारणात आलेली लोक शरद पवार यांचा उल्लेख एकेरी करता; म्हणून मी म्हणतो यांची डोकी ठिकाणावर आहेत का? याची चौकशी होणे गरजेचे…मेडिकल आणि नार्को पद्धतीने सुद्धा!’, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.
