Thursday, July 30, 2026
Latest NewsPUNE

नवीन सबसिडीमुळे सौर व्यावसायीकांमध्ये उत्साहाचे वातावरण

पुणे : घरगुती ग्राहकांसाठी महावितरणने ‘एमएनआरई ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलर अनुदान योजने’च्या दुस-या भागांतर्गत विविध क्षमतांच्या ग्रिड-कनेक्ट रूफटॉप सोलर प्लांटच्या ‘ईपीसी’ (डिझाइन, पुरवठा, उभारणी, चाचणी आणि कमिशनिंग) कामाकरिता विक्रेत्यांची ‘एम्पॅनलमेन्ट’ करण्यासाठी निविदा नुकतीच काढली आहे. मागील वर्षीच्या निविदेच्या तुलनेत या निविदेतील अनेक बाबी सौर ग्राहक व व्यावसायिकांकरिता अनुकूल आहेत. त्यामुळे सौर व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. २० ऑक्टोबर रोजी निविदापूर्व बैठक होणार असून २६ ऑक्टोबर निविदा भरण्याची शेवटची तारीख आहे.

नुकतीच महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनच्या (मास्मा) विभागीय पदाधिकाऱ्यांची एक बैठक या निविदेतील अटी आणि शर्तींवर चर्चा करण्याकरिता पार पडली. त्यात महाराष्ट्रातील सर्वच विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुधारित अटी व शर्ती पाहता महाराष्ट्रातील जनतेला लाभ मिळवून देण्याकरिता व सौर व्यवसाय वाढीकिरता या निविदेकडे सकारात्मकतेने पाहण्याची भूमिका घेण्याचे एकमताने ठरले. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध भागातील पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मास्माचे अध्यक्ष राजेश मुथा, सचिव जयेश अकोले, संचालक समीर गांधी, संजय देशमुख, संजय कुलकर्णी, मंगल अकोले, प्रदीप कुलकर्णी, शशीकांत वाकडे, सुहास घोटीकर, रोहन उपासणी, विजय साळुके, हणमंत भोसले, अतुल होनोले, नितिन कुलकर्णी, संदिप अल्तेकर, विनोद सुर्यवंशी, अमित कुलकर्णी, कल्याण देशपांडे, विजय वाणी, मयूर भांगडिया, अमित भोमा या सर्वांनी सहभाग नोंदवला.

त्याबरोबरच, ज्या अटी ग्राहक तसेच व्यावसायिकांकरिता घातक ठरू शकतील त्या दुरूस्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांना बळ देण्याकरिता तसेच अनुदानीत सौर ऊर्जा यंत्रणा खेडेपाड्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्रातील अधिकाधिक सौर व्यावसायिकांना संघटनेचे सदस्य बनविण्याचे प्रयत्न करीत आहोत. तसेच निविदा भरण्या संदर्भातील सर्वतोपरी सहकार्य सदस्यांना संघटने कडून केले जातील, असे ठरले आहे.

मास्माचे संस्थापक सदस्य मंगल अकोले व सुहास घोटीकर यांनी मास्माच्या उपक्रमांबद्दल समाधन व्यक्त करत कार्यकारिणीचे कौतुक केले. जुने प्रेसिडेंट संजय देशमुख, संजय कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी यांनी संघटनेतील सदस्यांना एकसंध राहून एकजूटीने काम करण्याचे आवाहन केले. एकीच्या बळाने अशक्य ते शक्य करता येईल, असे सुचवले.

सचिव जयेश अकोले यांनी माहिती दिली की, २०० मेगावॅटची निविदा आल्याने व्यवसायातील उत्पादकांपासून कामगारांपर्यंत सर्वच भागधारकांना अधिकचा व्यवसाय मिळेल. साधारणपणे १,००० कोटी रूपयांची उलाढाल होईल आणि कोविड-१९ मुळे व्यवसायात आलेली मरगळ निघू शकेल.

संचालक समीर गांधी यांनी या पार्श्वभूमीवर महावितरणला विनंती केली की, निविदेत अधिकाधिक सौर व्यावसायिकांना सामावून घेता यावे. ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारा व्यावसायिक देखील भाग घेऊ शकेल, अशा दृष्टीने निविदेतील अटी व शर्थीना आणखी सुलभ करावे.

मास्माचे अध्यक्ष राजेश मुथा यांनी तमाम सौर व्यावसायिकांना आवाहन केले की, या निविदेत अधिकाधिक लोकांनी भाग घ्यावा. सौर यंत्रणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचण्यासाठी काम करावे. हे करत असताना आपला व्यवसाय वृधिंगत होईल व नवीन रोजगार निर्माण होतील. पर्यावरण बदल रोखण्यासाठीच्या महायज्ञात ही आपल्याकडून एक छोटी पण महत्त्वपूर्ण आहूती ठरेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading