केबलच्या माध्यमातून ५०० कोटीचे उत्पन्न महापालिकेला मिळण्याची शक्यता
पुणे: महापालिकेकडून इमारती, विद्युत खांब, झाडांवरून टाकण्यात आलेल्या विविध प्रकारच्या ओव्हरहेड केबलवर कारवाई करून त्यांना भूमीगत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. सध्या शहरात टीव्ही, इंटरनेट, ब्रॉडबॅंड केबलसह इतर केबल टाकण्यात आलेल्या आहेत. एकाच भागातून अनेक केबल गेल्याने त्यांचे जाळे तयार झाल्याचेही चित्र शहरात विविध ठिकाणी पाहायला मिळते. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मध्ये अशा प्रकारे ओव्हरहेड केबल टाकण्याची तरतूद नाही. या बेकायदा केबल्सच्या माध्यमातून कंपन्या मोठ्याप्रमाणात व्यवसाय करून देखील महापालिकेला यातून एक पैसाही उत्पन्न मिळत नाही.
या सर्व प्रकारच्या ओव्हरहेड केबल्सची मोजणी करून त्याचा अहवाल तयार करण्यासाठी इरा टेलिइन्फ्रा या सल्लागार कंपनीची नियुक्त केला आहे. या सल्लागार कंपनीचा अहवाल आल्यानंतर केबल नियमितीकरण करण्यासाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.शहरात कोणत्याही भागात गेलात तर चौकात, इमारतीवर सर्वत्र केबल टाकलेल्या दिसून येतील. या सर्व केबल अवैध पद्धतीने टाकण्यात आल्या असून, यामुळे महापालिकेचे उत्पन्न तर बुडत आहेच, शिवाय शहराचे विद्रूपीकरण देखील होत आहे.यावर प्रतिबंध घालण्यासाठी या संबंधित कंपन्यांना दंड आकारून त्या भूमीगत करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. यामाध्यमातून ५०० कोटीचे उत्पन्न मिळेल असा दावा केला जात आहे.
महापालिकेने टीव्ही, इंटरनेटच्या ओव्हरहेड केबल्सच्या व्यवसायात शहरातील राजकीय व्यक्ती, काही लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. त्यांच्याकडून हद्दी वाटून घेऊन तेथे व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे दबाव झुगारून केबल अधिकृत करून घेण्याचे आव्हान महापालिके समोर आहे.
‘ओव्हरहेड केबल्सचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत सल्लागारास दिलेली आहे. सध्याचे प्रचलित रस्ते खोदाईचे शुल्क संबंधित कंपन्यांकडून घेतले जाणार आहे.’
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग
‘ओव्हरहेड केबल्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे, शिवाय महसूल बुडत आहे. या केबल भूमीगत करून त्यातून ५०० कोटी पेक्षा जास्तीचे उत्पन्न मिळू शकेल, शहर सुंदर दिसले.
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती
