शिवसेनेने जनतेसोबत बेईमानी करत सरकार स्थापन केलं – देवेंद्र फडणवीस
नागपूर : ‘दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत, आता मुखवटा काढा आणि तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती हे मान्य करा. काल मुख्यमंत्री जे बोलले त्यावरून फ्रस्ट्रेशन दिसून येतं. जनतेनं भाजपला नाकारलं नाही. काँग्रेस शिवसेनेला नाकारलं आहे आणि शिवसेनेला पासिंग मार्क्स दिले. जनतेसोबत बेईमानी करत हे सरकार स्थापन केलं आहे.’ असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यावर भाष्य केलं. ते म्हणाले,’तुम्ही वचन मोडलं. आणि मी मुख्यमंत्रिपद स्विकारलं आणि कारण माझ्या पित्याला मी वचन दिलं होतं. मी तुमच्या शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवले,. कदाचित जर दिलेले वचन भाजपने पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. मात्र अजुनही मी शिवसैनिकाला राज्याचा मुख्यमंत्री बनवणारच, अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यांचा या टीकेवर आता देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना सडेतोड उत्तर दिल आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचाराचं सोनं लुटलं जायचं. पण काल त्यांना गरळ ओकताना पाहिलं. जनतेने भाजपला नाकारलं नाही. काँग्रसे राष्ट्रवादीला नाकारलं. शिवसेनेला वरपास केलं याचं त्यांना विस्मरण झालं आहे. आम्ही 70 टक्के जागा जिंकल्या. तुम्ही 45 टक्के जागा जिंकल्या. तुम्हाला जनतेने नाकारलं. हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे, असं ते म्हणाले.
महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही
यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. कोलकाताची आजची व्यवस्था काय आहे हे माहीत आहे का? जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकावयाचं आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप जिवंत आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
