दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत मेट्रो क्रिकेट क्लब संघाची शानदार सुरुवात

पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गुरवीर सिंग सैनी(6-30) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मेट्रो क्रिकेट क्लब संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 145 धावांनी धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. तर डेक्कन जिमखाना, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी आणि अँबिशियस क्रिकेट अकादमी या संघांनी विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मेट्रो क्रिकेट क्लब संघाला 47.4षटकात सर्वबाद 224 धावा करता आल्या. यात निशांत नगरकरने 74चेंडूत 3चौकार व 1षटकारासह 74 धावांची संयमी खेळी केली. निशांतला प्रशाम गांधीने 38 धावा काढून साथ दिली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 102 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली. पीवायसीकडून नचिकेत वेर्लेकर(4-48), साहिल छुरी(3-30), यश खळदकर(2-36) यांनी सुरेख गोलंदाजी करत मेट्रो क्रिकेट क्लबला मोठे आव्हान उभारण्यापासून रोखले. याच्या उत्तरात मेट्रो क्रिकेट क्लबच्या गुरवीर सिंग सैनी(6-30), मिरझा अकिब(3-30), निशांत नगरकर(1-1)यांच्या भेदक माऱ्यापुढे पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डाव 21.2षटकात सर्वबाद 79 धावावर आटोपला. यात अमेय भावे  21, साहिल छुरी 18, तेजस तोलसणकर 11 यांनी थोडासा प्रतिकार केला. सामनावीर गुरवीर सिंग सैनी ठरला.
डेक्कन जिमखाना मैदानावरील लढतीत धीरज फटांगरे(65धावा)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 4 गडी राखून पराभव केला. अन्य लढतीत सचिन भोसले(4-31)याने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर अंबिशियस क्रिकेट अकादमी संघाने पुना क्लब संघाचा 3 गडी राखून तर, ओंकार राजपूत(3-20)याच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने युनायटेडस्पोर्ट्स क्लब संघाचा 3 गडी राखून पराभव केला.
स्पर्धेचे उदघाटन एमसीएचे खजिनदार शुभेंद्र भांडारकर, दोशी इंजिनियर्सचे संचालक अमित दोशी, वाईड विंग्जचे राजेंद्र मनोहर आणि चॅम्पियन स्पोर्ट्सचे अमित मदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महादेव जाधव, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, पाथ-वे फाउंडेशनचे सचिव सिद्धार्थ निवसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: