शक्तिस्वरुप तृतीयपंथी आणि देवदासी महिलांचा मेहंदी काढून सन्मान 

पुणे : भारतीय संस्कृतीमध्ये नारीला शक्तीचे रूप मानले जाते. त्यामुळे नवरात्रीमध्ये नारीरूपी शक्तीची पूजा, उपासना केली जाते. देवदासी महिला व तृतीयपंथी हे समाजातीलच  विशेष घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. तृतीयपंथी भगिनींचे औक्षण करून आणि त्यांच्या हातावर मेंदी काढून नवरात्रीनिमित्त त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.

साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ व मृगनयनी मेहंदी आर्ट यांच्यावतीने बुधवार पेठेतील ढमढेरे गल्ली येथे  ‘त्यांचाही सन्मान ‘  या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आशीर्वाद संस्था व पन्ना गाबरेल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा विधी प्राधिकरण पुणेचे सदस्य सचिव न्यायाधीश प्रताप सावंत, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शाह, मृगनयनी मेहंदी आर्टच्या धनश्री हेंद्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. 
प्रवीण वळवडेकर, भाग्यश्री मंथाळकर, प्रकाश यादव, सचिन हिंगणेकर, स्वप्नील दळवी, कुमार रेणुसे, प्रफुल पोतदार, वैशाली सिंघवी, किरण सोनिवाल, प्रकाश कुचेकर, पूनम क्षीरसागर, अलका गुजनाळ उपस्थित होते.

प्रताप सावंत म्हणाले, सर्वांना न्यायाची समान संधी मिळावी यासाठी सरकार विविध कायदे आणि योजना राबवित आहेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचता यावे म्हणून सरकार न्यायालय आपल्या दारी ही संकल्पना राबवित आहे. 
पीयुष शाह म्हणाले, तृतीयपंथीयांनी बुधवार पेठेतील महिलांसाठी खूप मोठे काम केले आहे. मागील दोन वर्षांच्या कोविडकाळात पन्ना गाबरेल यांनी बुधवार पेठेतील महिलांना भोजनाची व्यवस्था केली. त्यांच्या या कार्यासाठी आज  त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तृतीयपंथीयांकडे  नेहमीच तिरस्कार आणि हीन नजरेने पाहिले जाते. त्यामुळे नवरात्रीनिमित्त त्यांच्यातील शक्तीची पूजा करण्यासाठी मेहंदी काढून व औक्षण करून त्यांना सन्मानित केले.

Leave a Reply

%d bloggers like this: