राजकीय हस्तक्षेपामुळे ऐनवेळी BHMS चा पेपर रद्द – सिद्धेश्वर लटपटे

पुणे: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक विविध अभ्यासक्रमांची उन्हाळी – २०२१ परीक्षा दि. १२/१०/२०२१ ते ३०/१०/२०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. परंतु मंगळवार दि. १२/१०/२०२१ रोजी होणारी BHMS – प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा ऐनवेळी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित असताना रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक, मानसिक नुकसान झालेले आहे.

ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाला का घ्यावा लागला ? यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबाबत परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांची भेट घेत अभाविप च्या शिष्टमंडळाने विचारणा केल्यास त्यांनी धक्कादायक माहिती दिली १४ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता मागील तीन वर्षांपासून पूर्ण न झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगितले. अभाविप च्या या शिष्टमंडळात अभाविप प्रदेश सहमंत्री विराज भामरे, नाशिक महानगर मंत्री सौरभ धोत्रे, नगर मंत्री संस्कृती शेळके यांचा समावेश होतो.

वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या कार्यालयातून यासंदर्भात सूचना विद्यापीठाला देण्यात आल्याची सर्वत्र चर्चा आहे. मंत्री महोदयांनी थेट परीक्षा रद्द करण्यात हस्तक्षेप करणे हे किती संयुक्तिक आहे आणि या प्रकारचा हस्तक्षेप कोणासाठी हा प्रश्न देखील उपस्थित होतो. राज्य सरकार सातत्याने विद्यापीठांच्या स्वायत्तेवर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केला आहे. यापूर्वी देखील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्तक्षेपाबद्दल सर्वजण जाणून आहेतचं. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये व विद्यापीठातील हस्तक्षेप टाळावा अन्यथा अभाविप याविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देखील लटपटे यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: