परिचारिका व सेविका हा आरोग्य व्यवस्थेचा कणा – शोभा धारिवाल
पुणे : जेव्हा कोणताही रुग्ण रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात आणि काही वेळाने जातात. परंतु तेथे काम करणा-या परिचारिका या त्या रुग्णाबरोबर २४ तास असतात. त्या रुग्णाची काळजी घेण्याबरोबर त्याचे मानसिक धैर्य देखील वाढवितात, त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. म्हणून परिचारिका व सेविका या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील नवा विष्णु चौक नवरात्र मंडळ, बाजीराव रस्ता तर्फे ससून प्रांगणातील श्रीवत्स या संस्थेतील मुलांचा सांभाळ करणा-या सेविका आणि परिचरिकांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. श्रीवत्स संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्त्रीरोगतज्ञ डॉ. अंजली करी, मंडळाचे कार्याध्यक्ष कुमार रेणूसे, संतोष खंडाळकर, रविंद्र गांधी, उत्तम वालगुडे, शिरीष मोहिते, सदाशिव कुंदेन, विनायक घाटे, भगवान बलकवडे, नितीन पंडित, राजू शिंदे, कुमार शिंदे, संदीप लचके, मधुरा शितोळे, प्रविण शितोळे, श्रीवत्स संस्थेच्या मनिषा जाधव, शुभांगी अभ्यंकर आदी होते.
सिस्टर सुवर्णा राजगुरू, सिस्टर प्रिती भोपळेकर, अश्विनी स्वामी, राधा भडकवाड, शहनाज खान, विद्या थोपटे, माहेश्वरी देसाई, श्रद्धा सुर्वे, मंगल ढुमणे या श्रीवत्स संस्थेतील परिचारिका आणि सेविका यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व उपरणे असे सन्मानाचे स्वरुप होते.
शोभा धारिवाल म्हणाल्या, समाजात ज्या क्षेत्रात स्त्री कार्यरत असते, तेथे देखील आपलेपणाच्या भावनेने कार्यरत असते. त्यामुळे समाजातील अशा संस्था किंवा मंडळांनी स्त्रियांचा केलेला सन्मान त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. यामुळे त्या अधिक जोमाने कार्य करु शकतील. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया मनापासून आणि स्वत:ला झोकून देत कार्य करतात. कोरोनाच्या काळात देखील स्त्रियांनी उत्तम काम केले आहे.
डॉ. अंजली करी म्हणाल्या, आपल्या मुलांबरोबर आणि संस्थेतील या इतर मुलांना या परिचारिका आणि सेविका सांभाळ करतात, त्यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कोरोनाकाळात देखील आपल्या मुलांना घरी ठेवून संस्थेतील या मुलांबरोबर त्या कायम राहिल्या. हा पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेल्या या कार्याची पावतीच आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रा. संगिता मावळे यांनी सूत्रसंचालन केले. रविंद्र गांधी यांनी प्रास्ताविक केले.
