Friday, June 19, 2026
BLOGLatest News

ओबीसी विद्यार्थ्यांची होत असलेली ससेहोलपट थांबणार कधी ?

ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले तर सर्वांचीच झोप उडाली. उठता बसता आरक्षणाला विरोध करणारे काही राजकीय पक्ष मात्र आता अचानक साक्षात्कार व्हावा तसे रस्त्यावर उतरले. या आरक्षणा विषयी राज्यभर आंदोलने झाली, अजुनही होत आहेत. यामुळे काही प्रमाणात ओबीसी एकवटले. तरीही आणखी एकञ येण्याची उणीव भासत आहे…

या सर्व प्रक्रीयेत भरडला जाणारा महत्वाचा घटक कोण असेल तर तो म्हणजे विदयार्थी. आता ते कसं काय ? असा साहजिक प्रश्न आपल्याला पडेल. विद्यार्थीवर्गाची भुमिका व प्रश्न अशा वेळी जास्त महत्वाचे असतात, कारण ते समाजाचे भविष्य असतात, असायला हवेच.

सध्याच्या करोनाच्या काळात शैक्षणिक क्षेञाचे जेवढे हाल आणि नुकसान झाले तेवढे अन्य कोणत्या क्षेत्राचे झाले नाहीत. या सर्वांचा फटका ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आधीही बसत होता आता आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आता त्याची दाहकता वाढली. ओबीसी विद्यार्थ्यांवर शैक्षणिक बाबतीत खूपदा अन्याय होताना दिसून येतो याचे महत्वाचे कारण म्हणजे ईतर घटकाप्रमाणे या घटकातील विदयार्थी वर्ग आपल्या प्रश्नांवर एकञ येऊन आवाज उठवायला उदासिनता दाखवतो.

ओबीसी विद्यार्थ्यांकडे शासनाचे साफ दुर्लक्ष

जवळजवळ दोन वर्ष होत आले तरी सध्या राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना , केंद्र व राज्याच्या शिष्यवृत्ती मिळाल्या नाहीत. शिष्यवृत्ती साठी देण्यात येणारे आर्थिक बजेटच दोन्ही सरकारकडुन वर्षानुवर्षे कमी कमी होत चाललेय. आकडेवारी पाहिल्यास शिष्यवृत्तीसाठीच्या अर्जांची संख्या घटतेय व लाभार्थी देखील कमी होत आहेत. यावर कोणीही बोलत नाही किंवा ठाम भुमिका घेत नाही. शिष्यवृत्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भले झालेले आहे, अजुनही होत आहे. वेगवेगळया क्षेञात शिष्यवृत्तीच्या बळावर विदयार्थी प्रगती करत आहेत. जिथे अशा स्थानिक शिष्यवृत्ती बाबत मारामार तिथे परदेशातील शिष्यवृत्ती व त्यातील संधी, त्याचा निधी,लाभार्थी यांचावर न बोलले बरं. ‘वास्तविक पाहिल्यास शिष्यवृत्तीशिवाय शिक्षणच घेऊ शकत नाहीत अशा ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी म्हणजे जवळपास 50 टक्क्यांच्या आसपास आहे.’

विद्यार्थी वसतिगृहांची घोषणा हवेतच ?

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृहे बांधणार असल्याची घोषणा केली होती. त्याचे झाले काय? ते करण्यास मूहर्त कधी लागणार ? ठिक आहे अडचणी असतील हे आपण समजु शकतो. पण मग निदान हे सुरु होई पर्यंत पात्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तरी सुरु करायला हवा. तो देण्यास काय हरकत?

करोनामुळे अर्थिक चणचण सगळयांना भासतेय. पण त्याचा फटका विदयार्थी वर्गाला मोठया प्रमाणात बसतोय. शिक्षणापासुन वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलीये आणि तशात शिष्यवृत्तीस कात्री. याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

आता विद्यार्थ्यांनी कोणी मदतीला धावून येईल आणि आपले प्रश्न सोडवेल अशी तिळमाञ अपेक्षा बाळगु नका. स्वतः यात लक्ष घाला आणि संघर्षातुन तुमचा हक्क मिळवा. कारण आता विद्यार्थ्यांना मूलभुत गरजा भागवण्यासाठी देखील नाकी नऊ आलेत.

‘महाज्योती’ फक्त औपचारिकतेसाठीच ?

अन्य स्वायत्त संस्थांचा अभ्यास करुन शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी “महाज्योती” ही स्वायत्त संस्था काढली याचे कौतुकच. पण या संस्थेला सुरवातीपासूनच ग्रहण लागले की लावल्या गेले हे कळायला मार्ग नाही. वास्तव पाहू गेल्यास या स्वायत्त शैक्षणिक संस्थाची अवस्था “एक ना धड बारा भर चिंध्या”अशी झालीय..
आपण महाज्योतिच्या कामांचा आढावा घेऊयात :

  • नावाला अनेक कोर्सस सुरु आहेत,पण पुरेसा निधी कुठेच नाही.
  • अपुरे कर्मचारी,
  • अभ्यासक्रमांचे वेळापञक लावले नाही,
  • पुण्या साहख्या शहरात उपकेद्र नाही,
  • विद्यार्थ्यांना विद्यावेतन नाही,
  • JEE, NEET, SET चे क्लासेस अध्यापही सुरु नाहीत,
  • कौशल्य विकास योजना सुरु नाही,
  • समतादूत,तारादूत सारखे प्रसार व प्रचार करणारी मंडळी नाहीत,
  • संशोधन,पीएचडी विद्यार्थ्यांची प्रक्रीया पुर्ण झाली नाही.
    हे सगळे पाहून प्रश्न असा पडतो की महाज्योती नेमके करते काय ? नेमकं सुरु काय आहे की कागदावरच सगळं अलबेल ?

तुलना कोणत्याही स्वायत्त संस्थांची करायची नाही. अशाच अडचणी थोडयाफार प्रमाणात सर्व संस्थेच्या आहेत.

विद्यार्थ्यांना हक्कांसाठी एकत्र येण्याची नामी संधी :

विदयार्थी हिताच्या हक्काचे निर्णय घेताना धोरणकर्त्यांच्या आणि शासनकर्त्यांच्या हाताला लकवा बसतो. का माहीत नाही पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत नेहमीच हात आखडता घेतला जातो.
राज्यभर कधी नव्हे ते ओबीसी चळवळीला धार येत आहे. त्याचा प्रसार व प्रचार सुरु आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर हा समाज एकञ येत आहे.पण विदयार्थी त्यांच्या हिताच्या प्रश्नांवर आवाज कधी उठवणार?

सर्व राजकीय, सामाजिक संस्था, संघटना व व्यक्ती आप आपल्या पद्धतीने काम करतात. त्यांना दोष देत न बसता त्यांच्याचबरोबर सहभागी व्हावे. जनजागृती करणे हिच काळाची गरज आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांना आवाहन

ओबीसी विदयार्थी मिञांनो आपण आपल्या हक्कासाठी व कर्तव्यासाठी पुढे आलेच पाहिजे. एकंदर महाज्योती संस्थेची अवस्था व आपल्यासाठीच्या योजनांची दयनीय परिस्थिती पाहुन चीड येणे गरजेचे आहे. आपण आत्ता जर आवाज उठवला नाहीत एक लक्षात ठेवा सरकार कोणतेही असो फटका सर्वसामान्य ओबीसी विद्यार्थ्यांनाच बसणार आहे. त्यामुळे सजग व्हा. राजकीय हक्काबरोबर आपले शैक्षणिक अधिकार देखील टिकले पाहिजेत.

या शिष्यवृत्ती, वसहतीगृह या सारख्या मूलभुत गरजा जर नाहीच मिळाल्या तर विदयार्थी मुख्य प्रवाहात टिकून राहू शकणार नाहीत. वाढत्या शैक्षणिक फी, शिष्यवृत्ती रक्कमेत घट अशा गोष्टींमुळे भावी पिढ्यांचे नुकसान होणार आहे.

सर्वांनी विचार करा. भूमिका घ्या. काळ कोणासाठी थांबणार नाही. आम्ही या संघर्षात आपल्या सोबत नेहमी आहोतच, कधीही आवाज द्या…..

  • कुलदीप आंबेकर
    अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँड
    9689794776

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading