Pune – आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला ई कार खरेदीसाठी खर्चाची मर्यादा वाढविण्याच्या सूचना दिल्या
पुणे:प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रीक कार घेण्याचे आवाहन सरकार करत असले तरी महापालिकेला पदाधिकारी व अधिकाऱ्यांसाठी ६ लाखापेक्षा जास्त किमतीची गाडी खरेदी करता येत नाही. हे बंधन राज्य सरकारने हटवावे अशी मागणी महापालिकेतर्फे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. त्यावर ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महापालिकेने ई कार खरेदीसाठी खर्चाची मर्यादा वाढविण्यासाठी प्रस्ताव पाठवावा अशी सूचना महापालिकेला केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी नुकतीच राज्यातील महापालिकांची वायू प्रदूषण नियंत्रणासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यावेळी राज्यातील बहुतांश महापालिकांनी इ कारच्या खरेदीसाठी खर्चाच्या बंधनाचा मुद्दा उपस्थित केला. पुणे महापालिकेच्या ताफ्यात सुमारे ८०० गाड्या असून, सुमारे ६० गाड्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांसाठी वापरल्या जातात. ई कारमुळे इंधनात बचत होण्यासह प्रदूषण कमी होईल, नागरिकांनाही त्यासाठी प्रोत्साहित करता येईल यासाठी महापालिका इ कार खरेदीचा प्रयत्न करत असली तरी ई कारची किंमत १५ लाखापासून पुढे आहे. पण महापालिकेला ६ लाखाची मर्यादा असल्याने निर्णय घेता येत नाही. शहरात ई- वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांसाठी ई- कार खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात गेल्या चार वर्षांपासून तरतूद करण्यात येत आहे. पण नियमांच्या बंधनांमुळे कार खरेदी करता आली नाही.
याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ” महापालिकेला गाड्या खरेदीसाठी ६ लाखाचे बंधन आहे, इ कारखरेदीसाठी खर्चाची मर्यादा वाढवावी अशी मागणी महापालिकेकडून राज्यशासनाकडे करण्यात आली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत राज्यशासनास त्वरित प्रस्ताव पाठवावा अशी सूचना दिल्या आहेत.
