आर्यन खान सह इतर सर्व आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
मुंबई : बॉलीवूड किंग खान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सह इतर सर्व आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासीन आर्यन खान NCB च्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.
आर्यन खान याचे वकील मानशिंदे यांनी कोर्टात सांगितलं की, आरोपींना NCB च्या ताब्यात ठेवण्याची गरज नाही. दरम्यान उद्या ते आर्यन खान याच्या जामीनासाठी प्रयत्न करणार असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीने सर्व आरोपींची कोठडी वाढवून मागितली होती. मात्र आरोपींच्या वकिलाने याला विरोध करीत न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.
दरम्यान आर्यन खान याच्या जामीन अर्जावर उद्या 11 वाजता सुनावणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आर्यन खानच्या जामीनावर NCB ला उद्या सकाळी उत्तर देण्यात कोर्टाने सांगितलं आहे. त्याशिवाय हे उत्तर लिखित स्वरुपात द्यावं लागेल. आम्ही या जामीनाला विरोध करणार असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आर्यन खानविरुद्धच्या ड्रग्सचा खटला प्रामुख्याने दोन पुराव्यांवर आधारित आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यानं दावा केला आहे की, ते पुरावे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे असतील. आर्यन खानची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आर्यन खानने एनसीबीला दिलेल्या जबाबाची सत्यता अद्याप न्यायालयात सिद्ध करणे बाकी आहे. आर्यन खानविरोधातील दुसरा पुरावा म्हणजे त्याचं व्हॉट्सअॅप चॅट असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
