Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

पीएमआरडीएच्या विकासामुळे शहरातील गृह निर्माण क्षेत्र व रोजगाराच्या संधींमध्ये होणार वाढ

पुणे  : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्याअंतर्गत होणा-या विकासामुळे पुणे आणि परिसरातील घरांच्या संख्येत २०४१ पर्यंत तब्बल १३.३ लाखांची भर पडणार आहे. शिवाय रोजगाराच्या किमान २६ लाख संधी या दरम्यान उपलब्ध होतील. क्लस्टर पद्धतीने केलेल्या विकासामुळे राहण्यासाठी भारतातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याची ओळख होईलच याबरोबर या भागातील स्थानिक नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला देखील गती मिळेल, असे निष्कर्ष क्रेडाई पुणे मेट्रोने केलेल्या अभ्यासात समोर आले आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यावर क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने सखोल अभ्यास करीत काही विश्लेषणात्मक बाबी समोर ठेवल्या आहेत. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सदर निष्कर्ष सर्वांसमोर मांडण्यात आले. संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष राजेश चौधरी आणि दिलीप मित्तल यांनी पीएमआरडीए विकास आराखड्याबाबतीत विश्लेषण व सूचना यांसंदर्भात उपस्थितांसमोर सादरीकरण केले. हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा व देशातील तिस-या क्रमांकाचा विकास आराखडा असल्याने हा मूर्त स्वरूपात उतरविणे देखील मोठे काम आहे.

याविषयी अधिक माहिती देताना रणजीत नाईकनवरे म्हणाले, “पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच विकास आराखडा २०२१ – २०४१ बनविण्यात आला आहे. आयुक्त व त्यांच्या संपूर्ण टीमने केलेले काम निश्चितच कौतुकास्पद व नजीकच्या भविष्याचा पूर्ण विचार करीत केले असल्याचे विकास आराखड्यावरून जाणवते. त्यांनी विकास आराखड्यात केलेले अर्बन ग्रोथ सेंटर (युजीसी) व रुरल ग्रोथ सेंटर (आरजीसी) अशा पद्धतीची क्लस्टर रचना ही महत्त्वपूर्ण आहे. यामुळे पुणे महानगर हे एमएमआरडीए पेक्षा मोठे शहर म्हणून समोर येईल. या आराखड्यासाठी एकूण ६९१४ स्केअर किमी (सिंगापूर देशाच्या तब्बल ११ पट) भागाचे हवाई व उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी जमिनीची वैशिष्ट्ये, भू रचना, बिल्ट अप एरिया, शहरी व ग्रामीण भाग यांचा विस्तार या संदर्भात माहिती गोळा करण्यात आली. या सर्व बाबींमधून केलेल्या अभ्यासपूर्ण डीपीमुळे २०४१ पर्यंत या भागात १३.३ लाख घरे व २६ लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असे दिसून येते. हा विकास आराखडा सर्वांत मोठा विकास आराखडा असून तो यशस्वी झाल्यास देशातील राहण्यासाठीचे सर्वोत्तम शहर म्हणून पुणे शहराला ओळख मिळेल.”

सदर डीपी हा नागरिकांच्या राहण्याच्या दृष्टीने सोयीस्कर, विवेकी, लवचिक, कार्यक्षम आणि सक्षम असून येत्या काळात आतून व बाहेरील बाजूने जाणारा रिंग रोड, क्रेसेंट रेल्वे लाईन (८९.६९किमी), पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे, १२ मेट्रो लाईन्स यांमुळे या शहरात आणखी सुविधा उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती राजेश चौधरी यांनी दिली.

पुणे महानगर क्षेत्रात येत्या पुढील काही वर्षांत धोरणात्मक रित्या २६ टाऊन प्लॅनिंग स्कीम्स, ११ लॉजिस्टिक्स हब्ज, अनेक मल्टीमोडल हब येणार आहेत. शिवाय ३०० ते ५०० मीटर रुंदीचे ग्रीड होणार असल्याने वाहतुकीची सुलभताही वाढेल, असे दिसून येते.

या अंतर्गत नवी मुंबई विमानतळासाठी रॅपिड ट्रान्झिट हबमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर सोबतच राज्यातील इतर शहरांमधून येणा-या नागरिकांसाठी पुण्यामधूनच चेक – इन सुविधा उपलब्ध करून द्यावी, नवी मुंबई विमानतळ टर्मिनल्सशी हाय स्पीड कनेक्टिव्हिटी असावी, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संवहन केंद्रे असावीत, सांस्कृतिक केंद्र म्हणून आळंदीची वाढ होत असताना त्यासाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाव्यात, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक विद्यापीठांसाठी मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, टेकड्या व उताराचे वनीकरण झोनमध्ये रुपांतर करीत शहरातील हरित भाग वाढविण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण व्हावे. यासोबतच लो राईज डेव्हलपमेंट, लो डेन्सिटी डेव्हलपमेंट भागास परवानगी द्यावी, जेणेकरून या भागात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे सोपे होईल, अशा काही सूचना देखील क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने या मध्ये करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply