समाजातील सर्व ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सेवारुपी गंगोत्री पोहचविणार – केंद्रीयमंत्री विरेंद्रकुमार
पुणेः- ज्येष्ठांविषयीचे अनेक प्रश्न असून त्या प्रत्येक प्रश्नाचा प्राधान्यक्रम ठरवत टप्प्याने समाजातील सर्व ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सेवारुपी गंगोत्री पोहचविण्या संदर्भात केंद्र सरकार कटिबद्ध असून सामाजिक न्याय व सबलीकरण केंद्रीय मंत्रालयाच्या आर. आर. टी. सी. मार्फत हे उद्धिष्ठ गाठले जाईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलिकरण मंत्री विरेंद्रकुमार यांनी आज व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जनसेवा फाैंडेशनतर्फे ऑनलाईन पद्धतीने आयोजीत करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरीक मेळाव्यात विरंद्रकुमार बोलत होते. यावेळी शंभरी पार केलेले तसेच आपल्या जीवनात उत्तुंग कार्य केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक न्याय व सबलीकरण केंद्रीय मंत्रालयाच्या आर. आर. टी. सी. व सामाजिक न्याय मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवार दि. ४ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर आभासी पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.आज ज्येष्ठ नागरीक मेळावा सप्ताहाचा दुसरा दिवस होता.
विरेंद्रकुमार म्हणाले, जनसेवा फाैऊंडेशनमार्फत समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सुरु असलेले कार्य हे काैतुकास्पद असून मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे फाैंऊडेशनचे ब्रीद वाक्य ते काटेकोर अंमलात आणत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी मिळाली पाहिजे. केंद्र सरकार ज्येष्ठांच्या धोरणांबाबत काटेकोर असून सदैव दक्ष आहे. ज्येष्ठांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखत त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा देश बांधणिसाठी उपयोग करुन घेण्यास केंद्र सरकार उत्सुक आहे..
केंद्रीय सामाजिक न्याय सचिव सुब्रमण्यम म्हणाले, ज्येष्ठांच्या माध्यमातून आपल्याकडे मोठी क्रियाक्षिल, सक्रिय, अनुभव संपन्न मनुष्यबळ उपलब्ध आहे. या ज्येष्ठांचा केवळ परिवार, समाज या पुरताच मर्यादीत उपयोग करुन न घेता सकारात्मक दृष्ट्रया देशपातळीवर त्यांच्या अनुभवाचा उपयोग करुन घेता आला पाहिजे. ज्येष्ठांसाठी कार्यान्वित करण्यात आलेली हेल्प लाईन नंबर हा केवळ तांत्रिक नंबर न होता त्यास ज्येष्ठांना एकमेकांशी जोडणारा मानवी चेहरा प्राप्त झाला पाहिजे. ज्येष्ठां प्रती असलेल्या समस्या सोडविणे हे केवळ सरकारी किंवा स्वयंसेवी संस्थांचे कार्य या पुरता मर्यादीत न राहता ती सामाजिक चळवळ झाली पाहिजे.
यावेळी जनसेवा फौंडेशनचे अध्यक् ष डाॅ. विनोद शहा यांनी ज्येष्ठांच्या संदर्भात जनसेवा फौंडेशनतर्फे सुरु असलेल्या कार्याचा प्रास्ताविकाद्वारे धावता आढावा घेतला. फेसकाॅमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अरुण रोढे, ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डाॅ.उदयन दीक्षित यांनी ज्येष्ठांच्या डोळ्यांच्या ओरोग्याबाबत घ्यावयाच्या काळजी बाबत विस्ताराने मार्गदर्शन केले. तसेच इस्कॅनचे उपाध्यक्ष संजय भोसले यांनी लाॅक डाऊनच्या काळात इस्काॅनतर्फे केल्या गेलेल्या अन्नदान चळवळी बाबत विस्ताराने माहिती दिली. तसेच जयसिंगराव पाटील यांनी देखील थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
दिलीप पवार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
