Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे घटस्थापनेपासून उघडणार; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

६५ वर्षा वरील नागरिक, गर्भवती महिला व १० वर्षा खालील मुलांना प्रवेश नाही 

पुणे : राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सुचने’नुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात बंद असलेली धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) घटस्थापने (७ ऑक्टोबर) पासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. मास्कचा वापरणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जंतूकीकरण करणे या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. 

या शासकीय आदेशानुसार ६५ वर्षे वयावरील नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्ष वयाखालील मुले यांना धार्मिकस्थळी प्रवेश मिळणार नाही. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारे कामगार व कार्यकर्ते यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. तसेच धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी सहा फुट अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. धार्मिक स्थळे अथवा प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी थुंकण्यास बंदी असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर व्यक्ती ही भारतीय दंड संहिता, १८६०, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे. 

धार्मिक स्थळांसाठी सुचना

प्रवेशद्वारावर हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी व थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे

कोविड-१९ विषाणूचे प्रतिबंधात्मक उपाययोजना दर्शविणारे फलक अथवा भित्तीपत्रके लावावीत

प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत श्राव्य किंवा चित्रफीतद्वारे दररोज प्रसारण करावे

गर्दी नियंत्रित करण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून व्यवस्थापन करण्यात यावे

आवारातील दुकाने, स्टॉल्स, उपहारगृहाच्या ठिकाणी कोविड नियमावलींचे पालन करावे बंधनकारक  

वातानुकूलीत आवारात तापमान हे २४-३० डिग्री करण्यात यावे व सापेक्ष आर्द्रता ४०-७० असावी

मुर्ती ,पुतळा , पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास प्रतिबंध राहील

धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रभावीपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे

आवारात असलेले शौचालये व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा

याबाबतचे हमीपत्र पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे आवश्यक 

फोटो- प्रातिनिधीक 

Leave a Reply