Wednesday, November 18, 2026
BusinessLatest NewsPUNE

अनंत डिफेन्स सिस्टिम्स्ला एसआयडीएमचा राष्ट्रीय पुरस्कार

पुणे : सोसायटी आॅफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स या देशाच्या सुरक्षा यंत्रणेला विविध तंत्रज्ञान व उपकरणे पुरविणा-या संस्थेतर्फे पुण्यातील कोथरुडमधील अनंत डिफेन्स सिस्टिम्सला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अनंत डिफेन्स सिस्टिम्स चे व्यवस्थापकीय संचालक चेतन धारिया यांनी हा पुरस्कार स्विकारला.

कार्यक्रमाला एसआयडीएमचे अध्यक्ष जयंत पाटील, संस्थापक व माजी अध्यक्ष बाबा कल्याणी, उपाध्यक्ष एसपी शुक्ला यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. एसआयडीएम ही नॉन प्रॉफिट आॅर्गनायझेशन असून इंडियन डिफेन्स इंडस्ट्रीशी निगडीत असलेली संस्था आहे. या कार्यक्रमात देशभरातील सुरक्षा यंत्रणेशी निगडीत १२५ जणांनी प्रत्यक्षपणे तर सुमारे ५०० हून अधिक जणांनी आॅनलाईन पद्धतीने सहभाग घेतला. इंजेक्शन असेंबली फॉर इंजिन आॅफ टी ९० या उपकरणाकरीता अनंत डिफेन्स सिस्टिम्सला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राजनाथ सिंह म्हणाले, या संस्था भारताला उत्तम दर्जाचे आणि आर्थिकदृष्टया परवडेल, अशी संरक्षणाची सामग्री तयार करुन देत आहेत. यामुळे संरक्षण क्षेत्रातील साहित्याची निर्यात करण्याची भारताची क्षमता आणखी वाढणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत भविष्यात भारताला स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल आहे. फायटर एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर्स, रणगाडे आणि पाणबुडया तयार करण्याकरीता अशा संस्थांसोबत सरकार संलग्नपणे काम करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुरस्कार स्विकारताना चेतन धारिया म्हणाले, खडकी येथे ‘डिफेन्स एक्सपो १९८८’ या संरक्षण प्रदर्शनास दिलेल्या भेटीतून संरक्षणविषयक सुटे भाग उत्पादित करण्याचा उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मला मिळाली. संरक्षण साधनांचे उत्पादन आणि या साधनांसाठीच्या सुट्या भागांची निर्मिती क्षेत्रामध्ये अनंत डिफेन्स सिस्टीम्स ही संस्था कार्यरत आहे. भारतीय लष्कराप्रति पूर्ण समर्पणासह, उद्योजकता कौशल्ये आणि नावीन्यपूर्ण प्रतिभा वा परून भारतीय सैन्य दलासाठी स्वदेशीकरणाच्या माध्यमातून साडेतीन हजारांहून अधिक प्रकारचे यांत्रिकी भाग पुरवले आहेत. ज्यामध्ये ‘टी ९०’ आणि ‘टी ७२’ रणगाडे, ‘बीएमपी-१’ आणि ‘बीएमपी-२’ या पायदळाच्या लढाऊ वाहनांच्या निर्मितीसाठी लागणा-या इंजिनासह सुट्या भागांचा समावेश आहे.

Leave a Reply