शिपाई भरतीसाठी आलेल्या विद्यार्थांसाठी गणेशोत्सव कार्यकर्त्यांचे मदत केंद्र
पुणे : पुणे शहरात विविध पदांच्या भरतीसाठी खेड्यापाड्यातून विद्यार्थी येत असतात. यापैकी अनेक जणांना पुण्याची माहिती नसते. त्यामुळे भरती केंद्रापर्यंत जाण्यास अडचणी येतात. अनेक जणांची झोपण्याची देखील सोय नसल्याने रस्त्यावरच रात्र काढावी लागते, अशा बाहेरगावावरुन आलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या जय गणेश व्यासपीठने पुढाकार घेत विद्यार्थ्यासाठी मदत केंद्र उभारले.
पुणे शहर पोलिस व जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून शहरात पोलीस शिपाई भरती परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि पुस्तक देऊन पुणे रेल्वे स्टेशनवर स्वागत करण्यात आले. तसेच रात्री झोपण्याची देखील सोय करण्यात आली. स्वारगेट, पुणे रेल्वे व एस.टी. स्टेशन, शिवाजी नगर, वाकडेवाडी या ठिकाणी मदत केंद्र सुरु करण्यात आले होते. यावेळी शिरीष मोहिते, पीयूष शाह, हेमंत शिंदे ,सनी परदेशी ,स्वप्नील दळवी, राजेंद्र तिकोने, सिद्धांत कुलकर्णी अमर लांडे, विक्रम मोहिते, उमेश कांबळे यांनी परिश्रम घेतले. सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदत कक्ष उभारण्यात आले होते.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ, बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, कुंभार वाडा कसबा पेठेतील वंदेमातरम मित्र मंडळ, फडके हौद चौकातील विधायक मित्र मंडळ, गजेंद्र तरुण मंडळ, लहरिनाथ मित्र मंडळ, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्टच्या वतीने पोलीस भरती विद्यार्थाना सहकार्य आणि रात्री झोपण्यासाठी सोय करण्यात आली.
