Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

वारीचे पावित्र्य गणेशोत्सवात देखील यायला हवे- पराग ठाकूर

पुणे : गणेशोत्सव कार्यकर्त्यांने त्याच्या कार्याने समाजात स्थान मिळविले आहे. त्यामुळे गणेशोत्सव कार्यकर्त्या म्हणून त्याला तसा सन्मान देखील मिळायला पाहिजे. परंतु त्यासाठी काही नियम देखील कार्यकर्त्यांनी पाळले पाहिजेत. अनेक लोक उत्सवात चुकीचे वागतात. त्यामुळे हे उत्सवाचे स्वरूप बदलले पाहिजे. पंढरीच्या वारक-यांची जी पवित्रता वारीमध्ये आहे, ती पवित्रता गणेशोत्सवात आली तर कार्यकर्त्याचा खरा सन्मान होईल, असे मत ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी व्यक्त केले.
आम्ही कर्वेनगरकर व्यासपीठच्यावतीने काकडे पॅलेसच्या सभागृहात गणेश मंडळांचा विघ्नहर्ता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे राजाभाऊ घोडके, शिल्पकार विवेक खटावकर, भरत मित्र मंडळाचे बाळासाहेब दाभेकर, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, आम्ही कर्वेनगरकर व्यासपीठाचे संस्थापक महेश पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गणेश मंडळांना सन्मानपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात गणेशोत्सव मंडळांचे कार्य सांगणा-या पुस्तिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.

विवेक खटावकर म्हणाले, गणेश मंडळांनी कलाकाराला देखील काम दिले पाहिजे. तर नवे कलाकार पुढे येतील. कलाकाराला गणेशोत्सवात काम करताना जी उर्जा आणि अनुभव मिळतो, त्यामुळे त्याची कला आणखी फुलते. शिरीष मोहिते म्हणाले, गणेशोत्सव कार्यकर्त्या हा सामाजिक कायार्साठी नेहमी पुढे येतो हे त्याने या कोविड काळात दाखवून दिले आहे. परंतु अनेकदा त्यांच्यावर टिका केली जाते. जर गणेशोत्सव कार्यकर्ते संघटित झाले, सर्व मंडळे संघटित झाले तर त्याची ताकद सर्वात मोठी असेल. त्यावेळी मंडळांवर टिका करणा-यांनी देखील आपण आपल्या चांगल्या कार्यातून उत्तर देवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. 

महेश पवळे म्हणाले, भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या कर्तृत्वाने नावारुपाला आलेल्या कर्वेनगरमध्ये सर्व गणेश मंडळे ही सामाजिक वारसा जपत आहेत. त्यांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे, त्या भावनेतुनच आम्ही कर्वेनगरकर या व्यासपीठाद्वारे ४५ गणेश मंडळांचा एकत्रित विघ्नहर्ता गौरव सोहळा आयोजित केला आहे. गणेश मंडळे ही समाजाच्या रक्तवाहिन्या आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी उपनगरातील गणेश मंडळांशी सुसंवाद ठेवल्यास पुण्यात मोठी समाजक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. शिवाजी खरात यांनी सूत्रसंचालन केले. विकास माने यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading