गदिमा सन्मान हा अनमोल ठेवा : श्रीधर फडके
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात बाबूजींचा विवाह झाला. महम्मद रफी मंगलाष्टका गाण्यासाठी आले होते. माझ्या लग्नाचा स्वागत समारंभही याच सभागृहात झाला. आशीर्वाद देण्यासाठी गदिमा सपत्नीक आले होते. भावनिक नाते असलेल्या या सभागृहात मला गदिमा जीवनगौरव सन्मान मिळाला हा भावुक करणारा क्षण आहे. गदिमा सन्मान हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे असे मत ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी व्यक्त केले.
गदिमांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, गदिमा कुटुंबीय आणि महाराष्ट्र कामगार परिषद यांच्यावतीने आयोजित २९ व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवात फडके यांना गदिमा जीवनगौरव सन्मान साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे उपस्थित होते.
फडके म्हणाले, ‘गदिमा चित्रकवी होते त्यांच्या आणि बाबूजींच्या सहवासात माझे आयुष्य समृद्ध झाले. गदिमा आणि बाबूजी यांच्यात अद्वैत होते.’
डॉ. देखणे म्हणाले, ‘गदिमा महाराष्ट्राचे विदग्ध महाकवी आहेत. गीतरामायण हेच गदिमांचे चिरंतन स्मारक आहे.
जोशी म्हणाले, ‘गदिमा आणि बाबूजींचे जीवन हा सर्जनाचा महोत्सव होता. गीतरामायणामुळे गदिमा महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी झाले. स्वरतीर्थ होण्याचे भाग्य सुधीर फडके यांना लाभले. दोघांनी मिळून भावभक्तीचे पावनतीर्थ निर्माण केले. गीतरामायणामुळे महाराष्ट्राची श्रवणसंस्कृती श्रीमंत झाली. गीतरामायण पुढच्या पिढ्यापर्यंत पोचविण्यासाठी श्रीधर फडके यांनी मोठे योगदान दिले आहे. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
