पर्यावरणाचा सन्मान राखूनच शाश्वत विकास शक्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नाशिक : निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ही वर्तमानाची गरज आहे तसाच विचार पर्यावरण आणि विकासाच्या बाबतीत सर्वांना करावा लागणार आहे. विकास व पर्यावरण हे जणू एकमेकांचे परस्पर विरोधी शब्द आहेत, असे वातावरण अलिकडे सर्वत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा सन्मान राखूनच शाश्वत विकास शक्य होईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
नाशिक येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था ‘मित्रा’ च्या नूतन इमारतीच्याई-उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अभासी पद्धतीने उपस्थित होते. तर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य प्रधान सचिव सुजाता सौनिक, आमदार नरेंद्र दराडे, सरोज अहिरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, मित्रा चे संचालक प्रशांत भामरे, उपसंचालक महुवा बॅनर्जी आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, दिवसेंदिवस निसर्गाची बदलणारी रूपं त्यातून एकापाठोपाठ येणारी तौक्ते, निसर्ग व गुलाब यासारख्या चक्रीवादळांनी मानवी जीवनाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना कालच मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात आली आहे. या सर्वांची कारणमिमांसा करण्याची आपल्याला गरज आहे. विकासाच्या हव्यासापोटी आपण काही चुकीचे तर करत नाही ना? याचेही चिंतन व्हायला हवे. अतिवृष्टीमुळे पाणी दारातून घरात जातेय तेच पाणी दारातून न जाता ते नळातून घराघरात कसे पोहोचेल याचे व्यवस्थापन भविष्यात ‘मित्रा’ माध्यमातून होईल अशी आशा आहे.
नाशिकलाही करणार कृषी भवन : उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून येथील औद्योगिकीकरणाचा व नागरीकरणाचा वेग यांच्याशी शिक्षण, रोजगार आणि लोकसंख्या सांघड घालून शहरांच्या विकासाचे नियोजन सुरू आहे. राज्यात केंद्रासोबत १४ हजार कोटींच्या पाणी योजनांची उभारणी सुरू असून या योजनांच्या निर्मितीसोबतच जलसाक्षरता व जनजागृतीची गरज असल्याचे सांगून पुण्यात २२२ कोटी रूपये खर्च करून कृषी भवन निर्माण केले जात आहे, त्यापाठोपाठ ते नाशिकमध्येही उभारले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
