PMP – बदललेल्या पास दारांची अंमलबजावणी करा – प्रवाशांची मागणी
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तसेच जिल्ह्याच्या भागात धावणाऱ्या बसेसच्या पास दरातील बदलला मंजुरी देण्यात आली. या नवीन दराची अंमलबजावणी 7 सप्टेंबरपासून करण्याची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केली होती. मात्र, अद्यापही हे दर लागू केले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) पासेसच्या दरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कपात केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही सुरू झालेली नाही.येत्या 1 ऑक्टोबरपासून तरी नव्या दराने पासेस उपलब्ध व्हावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे
पीएमपी तिकीट मशीनमध्ये बदल करून तातडीने नवीन पास दराची आकारणी करणे आवश्यक होते. मात्र, ही घोषणा फक्त तेवढ्यापुरती राहिली. पीएमपीकडून मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी सांगितले.
प्रवाशांना सध्या दिवसभर प्रवास करण्यासाठी 70 रुपयांचा पास देण्यात येतो. मात्र, पुणे शहर हद्दीत 40 रुपये, पिंपरी-चिंचवड हद्दीत 50 रुपये आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीत 70 रुपये याप्रमाणे दैनंदिन पासेस देण्याचे नियोजन होते. यासह मासिक पासच्या दरातदेखील बदल केला आहे. मात्र, याची अंमलबजावणी लांबणीवर पडली असून, सध्या प्रवाशांना 70 रुपयांचा पास काढावा लागत आहे. त्यामुळे कमी दरातील पासेसची घोषणा होऊनही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहेत.
