कीर्तन सुरू असतानाच ह. भ. प. ताजुद्दीन महाराज यांचे हृदयविकाराने निधन
औरंगाबाद : हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ह. भ. प. ताजुद्दीन महाराज यांचे काल रात्री निधन झाले. ही घटना काल रात्री नंदुरबार येथे घडली. येथे कीर्तन सुरू असतानाच महाराजांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली बसले. अन् क्षणातच त्यांचे निधन झाले. ज्या मंचावर त्यांचे कीर्तन सुरू होते तेथेच त्यांचे निधन झाल्याने सर्व परिसर सुन्न झाला.
पहाडी आवाजाची देणगी लाभलेल्या ह. भ. प. ताजुद्दीन महाराज यांनी हिंदू मुस्लिम सलोखा जपण्यासाठी आयुष्यभर हजारो कीर्तने केली. ताजुद्दीन महाराज हे घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथे राहत होते. त्यांनी स्वतः विठ्ठल रुखमाई यांची देऊळं उभारली आहेत. त्यांचा जन्म औरंगाबाद जवळील सातारा भागात झाला होता. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि कुटुंबाला अनेक वेळा त्रास ही सहन करावा लागला होता. मात्र त्यांनी कीर्तन सोडले नाही.
