भाषा अनुवादकांच्या रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक
पुणे: नवमाध्यमे आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे परदेशी भाषेचा अनुवाद करणे आणि भाषा शिकण्याची प्रक्रिया काही प्रमाणात सोपी झाली असली तरी, यामुळे भाषा अनुवादकांच्या नोकऱ्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी परदेशी भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर, सबटायटल्स आणि अनुवाद करण्यासाठी अजूनही भरपूर वाव आहे, असे मत भाषा अनुवाद क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
जगभरातील भाषिक विविधता साजरी करण्याच्या उद्देशाने कौन्सिल ऑफ युरोपच्या पुढाकाराने आणि द अलीयॉन्स फ्राँसेज द पुणे व ग्योथे इंस्टिट्युट्सच्या संयुक्त विद्यमाने ‘युरोपियन डे ऑफ लँग्वेज’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी होणा-या या उपक्रमाचे हे विसावे वर्ष आहे. या उपक्रमा अंतर्गत ‘लँग्वेज लर्निंग इन द एरा ऑफ ट्रान्सलेशन टेक्नॉलॉजी’ या विषयावर एका संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्या वेळी या क्षेत्रातील संबंधित तज्ज्ञांनी आपली मते मांडली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबईचे इटालियन कल्चरल इन्स्टिट्यूट, नवी दिल्लीचे पोलिश इन्स्टिट्यूट, मुंबई मधील कॉन्स्युलेट जनरल ऑफ स्वित्झर्लंड, द लँग्वेज पोर्टल, गोवा आणि डेलिगेशन ऑफ द युरोपियन युनिअन टू इंडिया व भूतान यांचे विशेष सहकार्य या वेळी लाभले.
सदर कार्यशाळेत फ्रान्समधील नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च अर्थात सीएनआरएसच्या संशोधन विभागाचे संचालक टीअरी पबो, जर्मनीतील टीएच कोल्न विद्यापीठामधील इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अॅण्ड मल्टीलिंग्लूअल कम्युनिकेशनचे प्रोफेसर राल्फ क्रुगर, गोवा विद्यापीठातील फ्रेंच अॅण्ड फ्रॅन्कोफोन विभागाच्या सहाय्यक प्रोफेसर क्षमा धारवाडकर, इटलीमधील लीड्स विद्यापीठातील स्कूल ऑफ लँग्वेजेस, कल्चर्स अॅण्ड सोसायटीजच्या प्रोफेसर किएरा ला साला, पॉलिग्लॉट परिषदेचे संस्थापक रिचर्ड सिंकट आदी सहभागी झाले होते.
बीआयटीएस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी संदीप नूलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. मुंबईचे इटालियन कल्चरल इन्स्टिट्यूटच्या संचालिका फ्रॅन्चास्का अमेंडोला यावेळी उपस्थित होत्या. ग्योथे इंस्टिट्युट्स मॅक्सम्युलर भवन, पुणेच्या संचालिका मेरेम ब्रून्स आणि द अलीयॉन्स फ्राँसेज द पुणे च्या संचालिका अडेल स्पीझेर यांनी प्रास्ताविक केले. तर ग्योथे इंस्टिट्युट्स मॅक्सम्युलर भवनच्या रेणू जामगावकर यांनी आभार मानले.
या वेळी बोलताना टीअरी पबो म्हणाले, “आज कोणत्याही भाषेचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी अनेक प्रकारचे संगणकीय टूल्स आपल्याला उपलब्ध आहेत. शिवाय आपण थेट ऑनलाईन भाषांतर देखील करू शकतो, मात्र याद्वारे होणारे भाषांतर हे प्रमाणित असतेच असे नाही. चांगल्या पद्धतीचे भाषांतर करण्यासाठी ती भाषा येणारी व्यक्ती ही महत्वाची ठरते. वाढत्या भाषांतराच्या मागणीमुळे हा एक करिअरचा पर्याय देखील होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याकडे करिअरचा सक्षम पर्याय म्हणून पहावे शिवाय यामधील इतर संधीचा देखील शोध घ्यावा.”
दुस-या महायुद्धानंतर ख-या अर्थाने मशीन ट्रान्सलेशनला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मानवी भाषांतर आणि माशिद्वारे होणारे भाषांतर यांचे आलेख गेल्या काही वर्षांत बदलत असून मशीन ट्रान्सलेशन आता अधिक चांगल्या प्रकाराचा पर्याय म्हणून पुढे येत आहे. मात्र, असे असले तरी मानवी भाषांतर लुप्त होईल अशी भीती बाळगण्याची गरज नाही. याशिवाय अधिक चांगल्या पद्धतीने भाषा शिकण्यावर आपल्याला भर देता यायला हवा, अशे मत राल्फ क्रुगर यांनी मांडले.
या कार्यशाळेसोबतच जर्मन, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि पोलिश या भाषेतील लँग्वेज टीझर कार्यशाळा देखील या उपक्रमा अंतर्गत पार पडल्या. स्वित्झर्लंड देशात केवळ ५% बोलली जाणारी रोमान्श या भाषेची झलक व्हिडीओच्या माध्यमातून शिकण्याची संधीची या उपक्रमा अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती.
