Sunday, September 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत

पुणे:बंगालच्या उपसागरात घोंगावणारे “गुलाब” चक्रीवादळ आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्याकडे वेगाने झेपावत आहे. रविवारी (ता. २६) रात्री उशीरा हे वादळ किनारपट्टीला धडकणार आहे. किनाऱ्याला धडकताच या वादळाची तीव्रता ओसरणार असून, सोमवारी (ता. २७) सायंकाळपर्यंत ही वादळी प्रणाली महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २४) तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढल्याने शनिवारी (ता. २५) रात्री ‘गुलाब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. ही प्रणाली वेगाने किनाऱ्याकडे सरकत असून, रविवारी (ता. २६) दुपारी ओडिशाच्या गोपाळपूरपासून अग्नेयेकडे ८५ किलोमीटर, तर आंध्रप्रदेशच्या कलिंगापट्टणमपासून ईशान्येकडे ९५ किलोमीटर समुद्रात होती. पूर्व किनाऱ्यालगतच्या असलेल्या समुद्रात उंच लाटा उसळण्यास सुरूवात झाली असून, वादळी पावसाच्या ढगांची दाटी होऊ लागली आहे.

रात्री उशीरा हे चक्रीवादळ ताशी ७५ ते ९५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या गोपाळपूर आणि कलिंगापट्टणम जवळ किनाऱ्याला धडकेल. प्रणाली किनाऱ्याला धडकताना आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम, विजयनगरम, ओडिशातील गंजम या जिल्ह्याच्या किनाऱ्यालगतच्या सखल भागात अर्धा मीटर उंचीच्या लाटा शिरण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणामध्ये स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात दोन दिवस जाणवणार प्रभाव
जमीनीवर आल्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता ओसरणार असून, आज (ता. २७) ही प्रणाली विदर्भापर्यंत पोचण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दोन दिवस प्रभाव जाणवणार आहे, या काळात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात सोमवारी (ता. २७) विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात, तसेच मंगळवारी (ता. २८) कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सोमवारी (ता.२७) विदर्भ, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
कोकण: रायगड, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, नाशिक.
मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.
विदर्भ : गडचिरोली, यवतमाळ

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading