पवन सिंह यांची नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या (NRAI) संयुक्त महासचिवपदी फेरनिवड
पुणे: पुणे स्थित गन फॉर ग्लोरी या देशातील अग्रगण्य नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक, ऑलिम्पिकच्या ज्युरी अर्थात पंच समितीत निवड झालेले पहिले भारतीय असलेले पवन सिंह यांची नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या (NRAI) संयुक्त महासचिवपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वी चंदीगढ येथे झालेल्या निवडणुकीमध्ये सदर पदासाठी पवन सिंह यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सिंह यांचा या पदावरील कार्यकाळ पुढील ४ वर्ष असेल.
नेमबाजी (शुटींग) या खेळाच्या भारतातील व्यवस्थापनामध्ये सक्रीय असणाऱ्या आपल्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला यांचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया सिंह यांनी दिली. तसेच येत्या काळात नेमबाजी खेळाचे चांगले प्रशिक्षक घडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले देशात नेमबाजी (शुटींग) हा खेळ मोठ्या प्रमाणत लोकप्रिय होताना दिसतोय परंतु ज्या वेगाने खेळाडूंची संख्या वाढत आहे ते बघता प्रशिकांची संख्या अपुरी पडत आहे. पुढील ३ ते ४ वर्षात विविध स्तरावर सुमारे १००० प्रशिक्षक घडविण्याचा आपला मानस आहे असे सिंह यांनी नमूद केले.
इंटरनॅशनल शुटींग स्पोर्टस् फेडरेशन (ISSF) या जागतिक स्तरावर नेमबाजी खेळाचे नियमन करणाऱ्या संस्थेच्या पंच समितीत (ज्युरी) सलग दोन वेळेस स्थान मिळवणारे पवन सिंह हे पहिले व एकमेव भारतीय होत. याबरोबरच इंटरनॅशनल शुटींग स्पोर्टस् फेडरेशन (ISSF) तर्फे भारतात आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेचे उत्तमरित्या व्यवस्थापन करण्यात सिंह यांचा मोठा वाटा होता.
