Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मराठवाड्याच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही – अशोक चव्हाण

औरंगाबाद :- मराठवाड्याच्या विकासाकरीता दळणवळणाची साधने महत्वाची असून रस्त्याचा विकास झाल्यास मराठवाड्याचा विकास होईल आणि म्हणूनच रस्त्याच्या कामांकरीता निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे दिली.

कुंभेफळ ता.जि.औरंगाबाद येथे 14 व्या वित्त आयोगातून महिला व बालकांसाठी सुसज्ज रुग्णालय इमारतीचा लोकार्पण तसेच कुंभेफळ ते टाकळी, केंब्रिज ते सावंगी रस्त्याच्या भूमिपूजन यासह कुंभेफळ येथील जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन श्री.चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार सुभाष झांबड, कल्याण काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, विलास बापू औताडे, कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या सरपंच कांताताई सुधीर मुळे, उपसरपंच मनिषा ज्ञानेश्वर शेळके, आदींची उपस्थिती होती.

लाडसावंगी ते करमाड हा रस्ता सी.आर.एफ.च्या माध्यमातून 15 कि.मी. रस्त्याकरीता मंजुरी देत श्री.चव्हाण म्हणाले की, नागपूरच्या धर्तीवर मराठवाड्यातून पुणे मार्गे मुंबई बुलेट ट्रेन गेली पाहिजे. याकरीता आपण सर्वांनी राजकीय मतभेद बाजुला सारुन मराठवाड्याच्या दर्जेदार विकासाकरीता एकत्र काम करत मराठवाड्यात विकास खेचून आणू असा विश्वास व्यक्त करत चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले याकरीता लवकरच निधी उपलब्ध करण्याकरीता मी व्यक्तीश: प्रयत्नशील राहील. पुढील तीन वर्षात मराठवाड्यात सुमारे 900 कि.मी. रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वरुड काझी ते एमआयडीसी, लाडगाव ते जडगाव या रस्त्यांकरीता 4 कोटी रुपये निधी देखील उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन देखील चव्हाण यांनी यावेळी दिले.

ग्रामीण विकासाकरीता सोलापूर हायवे, जालना हायवे, कुंभेफळ ते टाकळी रस्त्याची कामे हाती घेण्यात आली असून चिकलठाणा ते सावंगी साधारण 13 कोटीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत आहे असे सांगून श्री.चव्हाण यांनी कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या इमारतीचे व येथे होत असलेल्या विविध कामांचे कौतुक करत येथील ग्रामपंचायतींचा आदर्श सबंध राज्याने घ्यावा असे देखील कौतुकाने म्हणाले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading