पश्चिम महाराष्ट्रात ५ लाख अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या मोफत लसीकरणाचे ध्येय
अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक
व सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या महाअभियानाला गती
पुणे : पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि पीपीसीआर यांच्या संयुक्त प्रयत्नाने पुणे महानगरासह पश्चिम महाराष्ट्र प्रांतभरामध्ये अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ‘वज्रनिर्धार’ हे मोफत लसीकरण महाअभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत १ लाख ३२ हजार २९५ हून अधिक नागरिकांना मोफत लस दिली गेली आहे. तर पुणे महानगर व पश्चिम महाराष्ट्र प्रांत मिळून ५ लाख मोफत लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीकरण अभियानासाठी सर्व लसी मोफत दिल्या जात आहेत.
लसीकरणासाठी विविध कंपन्यांनी आर्थिक पाठबळ देऊ केले असून पुणे महानगरातील ७५ हून अधिक संस्था,संघटना, मंडळे व धार्मिक ट्रस्ट यांचा ऊस्फुर्त सहभाग आहे. अशी माहिती पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शिरीष देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. बहार कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव हे याप्रसंगी उपस्थित होते.
१५ ऑगस्ट २१ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या वज्रनिर्धार मोफत लसीकरण महाअभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. पुणे महानगरातील विविध भागात असलेल्या निरामय, संजीवन हॉस्पीटल डेक्कन, सेवा आरोग्य मंडळ, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, सेवा सहयोग, महाराष्ट्र आरोग्य मंडळ, कोद्रे हॉस्पीटल, शाश्वत हॉस्पीटल, कोहकडे हॉस्पीटल, आयमॅक्स हॉस्पीटल, स्वरूपवर्धिनी, सुश्रूत हॉस्पीटल, मथुरा हॉस्पीटल, के.के.केयर हॉस्पीटल चंद्रसखा फाऊंडेशन व आज्ञा हॉस्पीटल, यश फाऊंडेशन (सिटी कॉर्प ग्रूप), सेवा आरोग्य फाऊंडेशन, सुराज्य सर्वांगीण विकास संस्था, स्पार्क, लोकविकास मंडळ, जनसेवा न्यास, विविध गणेश मंडळे लसीकरण शिबिर आयोजनाच्या माध्यमातून या महाअभियानात सहभागी झाली आहेत. तर पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील कोल्हापूर सांगली सातारा, नाशिक या चार जिल्ह्यांत देखील हे अभियान सुरू आहे.
‘ही आमची समाजाप्रती बांधीलकी’
“अत्यल्प उत्पन्न असलेल्या, गरीब, ज्यांना पैसे भरून लस घेणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला. समाजाप्रतीची आमची बांधीलकी म्हणून आम्ही याकडे पाहतो. अशा अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सहभागी सामाजिक संस्था अगदी नियोजनपूर्वक, विश्वासार्ह, पारदर्शक पद्धतीने काम करीत आहेत त्याची अंमलबजावणी करीत आहेत.”
– आदर पुनावाला (मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया)
