यशवंतराव गडाख यांनी साहित्य परिषदेला दिले वर्षभराचे निवृत्तीवेतन
पुणे – संसदेचे आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विश्वस्त आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी माजी आमदार म्हणून मिळत असलेल्या निवृत्ती वेतनाची वर्षभराची रक्कम सात लाख अडुसष्ट हजार रुपये महाराष्ट्र साहित्य परिषदेला देणगी म्हणून दिली आहे. या देणगीचा धनादेश आणि पत्र लेखक अरुण शेवते आणि दत्तात्रय अत्रे यांनी गडाख यांच्या वतीने मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे सुपूर्द केले.
“कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेला देखील त्याची झळ बसलेली आहे, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्राच्या विस्तार कार्याच्या गतीला खीळ बसलेली आहे.
तेव्हा साहित्य, संस्कृतीची पंढरी असलेल्या या मातृसंस्थेला फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी माजी आमदार म्हणून मिळत असलेल्या वर्षभराच्या पेन्शनची रक्कम रु. ७,६८,०००/- (अक्षरी रुपये सात लाख अडुसष्ट हजार मात्र) देणगी स्वरूपात देत आहे.” असे गडाख यांनी प्रा. मिलिंद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
प्रा. जोशी म्हणाले, ‘गेल्या दीड वर्षापासून परिषदेचे सभागृह, अतिथीनिवास, ग्रंथालय, ग्रंथप्रदर्शन बंद होते त्याचा मोठा आर्थिक फटका परिषदेला बसला. कार्यालय व्यवस्थापनावरचा खर्च, बँकांचे कमी झालेले व्याजदर आणि शासनाने दहा लक्ष रुपयांच्या अनुदानापैकी केवळ एक लक्ष रुपयेच अनुदान दिल्याने या नुकसानात भरच पडली. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते आहे. अशा काळात संवेदनशील राजकारणी आणि समाजमनस्क साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केलेली ही मदत मोलाची आहे.’
