राज्यात महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धती
मुंबई : राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्यात येणार आल्याची माहिती आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ बैठकी पार पडली. यावेळी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तिथे तीन पालिका सदस्य, परंतु, दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
