Thursday, November 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून; शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत- अनंत गिते

श्रीवर्धन : शरद पवार (Sharad Pawar) आमचे नेते होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादीचा (NCP) जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस ( Congress) कधीच एक होऊ शकत नाहीत, असे मत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांनी व्यक्त करत नव्या वादाला सुरुवात केली आहे.

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, या शब्दांत गीते यांनी निशाणा साधला.

शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे, हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपले सरकार आहे. आपले कशासाठी म्हणायचे तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपले गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असे गीते म्हणाले.

दोन्ही काँग्रेस कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मते नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असे अनंत गीते यांनी म्हटले आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर अज्ञात वासात गेलेले अनंत गीते पुन्हा रायगडच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. श्रीवर्धन येथे त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे व्यासपीठावर उपस्थित होते.

Leave a Reply