एआरएआयच्या वतीने ‘सिंम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०२१’ चे आयोजन
पुणे : पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयच्या वतीने येत्या २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ दरम्यान सिंम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०२१ (एसआयएटी २०२१) या प्रसिद्ध वाहन विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेची ही १७ वी आवृत्ती असून ‘रिडिफाईन मोबिलिटी फॉर फ्युचर’ ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच ही परिषद ऑनलाईन पद्धतीने आजोजित करण्यात येणार आहे असे परिषदेचे संयोजक डॉ. सुकृत ठिपसे यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेस एआरएआयचे इतर पदाधिकारी नितीन धांडे – वरिष्ठ उपसंचालक, आनंद देशपांडे – वरिष्ठ उपसंचालक, विजय पंखावाला – उपसंचालक आणि बी. व्ही. शामसुंदर – उपसंचालक आदी उपस्थित होते. एसएई इंडिया आणि एसएई इंटरनॅशनल (अमेरिका) यांचे सहकार्य सदर परिषद आयोजीत करण्यात लाभलेआहे.
परिषदेविषयी अधिक माहिती देताना डॉ. रेजी मथाई म्हणाले, “एआरएआयच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली सिंम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी ही वाहनउद्योग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेली परिषद आहे. वाहनउद्योग क्षेत्रातील संकल्पना, भविष्य, तांत्रिक प्रगती यांचा आढावा यामध्ये घेण्यात येतो. वाहन उद्योगाशी संबंधित जगभरातील तज्ज्ञ, अभियंते, विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार असून ४० प्रमुख व्याख्यानांबरोबरच २०० हून अधिक तांत्रिक शोधनिबंधांचे सादरीकरण यावेळी होईल.”
परिषदेचे संयोजक डॉ. सुकृत ठिपसे म्हणाले की यंदा भविष्यातील दळणवळणाच्या स्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जगभरातील तज्ञ प्रवाशांची सुरक्षितता, अॅडव्हांस ड्रायव्हर असीसटन्स सिस्टीम, जैव इंधन, बांधकाम क्षेत्रात लागणारी वाहने, इलेक्ट्रिक वाहने, प्रदूषण मोजमापन आणि नियंत्रण, नियमावलींचे सुसूत्रीकरण, वाहन उद्योगाला लागणारे साहित्य आणि सार्वजनिक वाहतूक आदी विषयांवर आपले विचार व्यक्त करतील.
परिषदेचे उदघाटन केंद्र सरकारच्या अवजड उद्योग खात्याचे मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते होणार असून सांगता समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. अर्थात दोघेही मान्यवर हे इंटरनेट च्या माध्यमातून सदर परिषदेत सहभागी होतील.
खास विद्यार्थ्यांसाठी या परिषदेदरम्यान शोधनिबंध सादरीकरण व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे उत्कृष्ट शोधनिबंध व पोस्टर प्रेझेंटर्सना पुरस्कार देत गौरविण्यात येईल.
