Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRA

सोनाली नवांगुळ व डॉ.मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandr Nemade)  यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. तसेच, सोनाली नवांगुळ (Sonali Nvangul)  यांना मराठीतील अनुवादासाठी आणि डॉ.मंजुषा कुलकर्णी  (Dr. Mnajusha Kulkarni) यांना संस्कृत भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्य अकादमीने शनिवारी मानाच्या फेलोशिपची व वर्ष 2020च्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत फेलोशिप पुरस्कारांसाठी 7 साहित्यिकांची तर 24 भाषांतील अनुवाद  पुरस्कारांची  निवड करण्यात आली.

भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची मानाची फेलोशिप

लेखक भालचंद्र नेमाडे यांना मराठी भाषेतील साहित्यिक योगदानासाठी साहित्य अकादमीची फेलो‍शिप जाहीर झाली आहे. मराठीसह बंगाली, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, संस्कृत आणि तामीळ भाषेतील योगदानासाठी  साहित्यिकांनाही मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सोनाली नवांगुळ यांना मराठी भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार

मराठी लेखिका सोनाली नवांगुळ यांनी तामीळ भाषेतून मराठीत अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखिका सलमा यांच्या ‘इरंदम जामथिन कथाइ’ या तामीळ भाषेतील कादंबरीचे मराठी अनुवादित ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाच्या ‘भारतातील लेखिका’ या लेखमालेतील 2015 मध्ये प्रकाशित पुस्तक होय. श्रीमती नवांगुळ यांनी अपंगत्वावर मात करत साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. ‘स्पर्शज्ञान’ या ब्रेल लिपीतील पाक्षिकाच्या त्या संपादन करीत आहेत. पुणे येथे आयोजित अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

मंजुषा कुलकर्णी यांना ‘प्रकाशवाटा’ पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी पुरस्कार

सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या आत्मकथनाच्या संस्कृत भाषेतील ‘प्रकाशमार्गा:’ या अनुवादित पुस्तकासाठी लेखिका मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखिका, कवियित्री, व्याख्याता आणि निवेदिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत तसेच त्यांनी नाट्यप्रयोगही केले आहेत.

जयश्री शानबाग यांच्या ‘स्वप्न सारस्वत’ या कोकणी भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार

लेखिका जयश्री शानबाग यांच्या ‘स्वप्न सारस्वत’ या कोकणी भाषेतील अनुवादित पुस्तकास कोकणी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुस्कार जाहीर झाला आहे. गोपालकृष्ण पै यांच्या ‘स्वप्न सारस्वत’ या कन्नड पुस्तकाचा हा कोकणी अनुवाद आहे.

Leave a Reply