रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या ‘महादान पुण्य महान’ मोहिमेला सुरुवात
पुणे – प्रतिवर्षाप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज आयोजित ‘महादान.. पुण्य महान’ या मोहिमेला रविवारी कोथरूडमधील स्नेह पॅरेडाईज या निवासी संकुलात सुरुवात झाली.
पितृपक्षातील दानाला मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज गेल्या सात वर्षांपासून ‘महादान.. पुण्य महान’ ही मोहीम राबवित असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विनायक पेठे यांनी उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी दिली. आर्थिक, वस्तुस्वरूपात मिळणारी मदत संस्थेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविली जाते. शहरातील निवासी संकुलांमधून रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे पदाधिकारी आणि सदस्य दात्यांकडून मिळणारी यथायोग्य मदत गरजूंपर्यंत पोहोचवितात. रविवारी स्नेह पॅरेडाईज, पौड रस्ता, कोथरूड येथे स्वाती मुळे आणि चारुता वेदपाठक यांच्या नेतृत्वाखाली ‘महादान.. पुण्य महान’ या मोहिमेला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागात ही मोहीम दि. 5 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. धान्य, वापरायोग्य कपडे तसेच रोख स्वरूपातही मदत स्वीकारली जाणार आहे. आर्थिक स्वरूपात मिळालेल्या निधीतून ससून रुग्णालयातील बालरुग्ण कक्षातील लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया विभागाला तसेच पुणे ब्लाईंड मेन्स असोसिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटलाही मदत करण्यात येणार आहे.
कोकणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शाळांना मदत, राज्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी पुस्तकसंच, गरजू दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूट व कृत्रिम अवयवही या मदतीतून दान केले जाणार असल्याचे अध्यक्ष पेठे यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होण्यासाठी मधुमिता बर्वे (मो. 9422000638), सचिन हनमघर (मो. 9823334201) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रोटरीतर्फे करण्यात आले आहे.
