राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील तर भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी
मुंबई: काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजप कडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षा कडून रजनी पाटील (Rajani Patil) यांच्या नावाची तर भाजपकडून संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे आज एकाच दिवशी या दोन्ही नावांची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत संजय उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केली.
रजनी पाटील कोण आहेत ?
काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या रजनी पाटील यांनी राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदे पासून केलेली आहे. 1996 साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. तर यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. विशेष म्हणजे विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही रजनी पाटील यांचे नाव आहे. त्या प्रस्तावर अजून शिक्कामोर्तब न झाल्याने त्यांना पुन्हा संधी दिली गेल्याची चर्चा आहे. सध्या त्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.
संजय उपाध्याय कोण आहेत?
संजय उपाध्याय यांच्या राजकारणाची सुरुवात भाजयुमोपासून झाली. काही काळ ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही होते. आता ते भाजपचे मुंबई सरचिटणीस आहेत. तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपाध्याय यांना उमेदवारी दिली गेल्याचे सांगितले जात आहे.
