एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, आर्यन्स क्रिकेट क्लब संघांनी उदघाटनाचा दिवस गाजवला
पुणे : हेमंत पाटील(एचपी) प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना व आर्यन्स क्रिकेट क्लब या संघांनी अनुक्रमे डेक्कन जिमखाना व हेमंत पाटील क्रिकेट अकादमी या संघाचा पराभव करून आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत तनय सांघवी(3-21),अक्षय काळोखे(3-20)यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स क्रिकेट क्लब संघाने हेमंत पाटील क्रिकेट अकादमी संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ओंकार खाटपे 36, सचिन भोसले 36, धनराज शिंदे 22, आकाश बेनाली नाबाद 13यांनी केलेल्या धावांच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अकादमी संघाने 20षटकात 9बाद 145 धावा केल्या. आर्यन्स क्रिकेट क्लबकडून तनय सांघवी(3-21), अक्षय काळोखे(3-20), विवेक कौशिक(1-5), हॅरी सावंत(1-25)यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात आर्यन्स क्रिकेट क्लब संघाने 15.4षटकात 4बाद 146धावा करून हे आव्हान पूर्ण केले. सलामीची जोडी हॅरी सावंतने 38 धावा व तनपुरे नीलकंठ 29 धावा यांनी 25 चेंडूत 57 धावांची खेळी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर रणजीत निकम नाबाद 30, अमेय श्रीखंडे 22, विवेक कौशिक नाबाद 15 यांनी धावा काढून संघाला सहज विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी तनय सांघवी ठरला.
दुसऱ्या सामन्यात प्रीतम पाटील(नाबाद 67धावा) व सिद्धांत वीर(66धावा)यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 9 गडी राखून पराभव करत धडाकेबाज सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना संघाने 20षटकात 4बाद 148 धावा केल्या. वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर हर्ष सांघवी नाबाद 40, आशय पालकर नाबाद 39, धीरज फटांगरे 28, स्वप्नील गुगळे 20, स्वप्नील फुलपगार 14 यांनी धावा करून संघाचा डाव सावरला. पीवायसीकडून नचिकेत वेर्लेकर 1-17, रोहन दामले 1-25, आदित्य डावरे 1-26, प्रदीप दाढे 1-31) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 13.3 षटकात 1 बाद 151धावा करून हे आव्हान पूर्ण केले. सलामीची जोडी प्रीतम पाटीलने 33 चेंडूत 3चौकार व 7 षटकारासह नाबाद 67धावा व सिद्धांत वीरने 48 चेंडूत 8चौकार व 2षटकारासह 66 धावा करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. प्रीतम व सिद्धांत यांनी पहिल्या गड्यासाठी 81 चेंडूत 141 धावांची भागीदारी केली. सामनावीर प्रीतम पाटील ठरला.
स्पर्धेचे उदघाटन माजी रणजीपटू आणि सातारा जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव केतन दोशी, हेमंत पाटील क्रिकेट अकादमीचे हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
