पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांकडे त्यांनी आपला राजीनामा आज सुपूर्द केला. राजीनाम देण्यापूर्वी अमरिंदर सिंह यांनी चंढिगड येथील त्यांच्या निवासस्थानी आपल्या बाजूने असलेल्या आमदारांसोबत बैठक घेतली. त्यानंतर अमरिंदर सिंह यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमरिंदर सिंह म्हणाले, ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्री बनवावं. सरकार चालवण्यासंदर्भात माझ्यावर संशय निर्माण करण्यात आला आहे. माझा अपमान करण्यात आला. मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे. सकाळी मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनाम्यासंदर्भात माहिती दिली होती. मला सर्व रस्ते खुले आहेत. सर्व पर्यायांवर विचार केला जाईल. समर्थकांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यातील आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. जवळपास 40 हून अधिक नाराज आमदारांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पदावरुन हटवावं अशी भूमिका घेत हायकमांडला पत्र लिहिलं होतं. त्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पंजाबच्या नेतृत्वात बदल करणार असल्याची चर्चा आधीपासून सुरु होती.
My father submitting his resignation to HE the Governor Sahib of Punjab. pic.twitter.com/RyINJSUeh5
— Raninder Singh (@RaninderSingh) September 18, 2021
