Sunday, August 2, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुणे : शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. मानाच्या व प्रमुख मंडळांच्या गणपतीचे सकाळी दहा वाजल्यापासूनच मंडपातच विसर्जन होईल. नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर पडू नये. विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहण्यावरच भर द्यावा, असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी केले आहे.

पुणे पोलिसांकडून मागील वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी गर्दी होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ.शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली मानाच्या व प्रमुख मंडळांच्या बैठका झाल्या आहेत.

याबद्दल बोलताना डॉ. शिसवे म्हणाले, ‘मानाच्या गणपतीचे विसर्जन सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होऊन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संपेल. सर्व मंडळे आपल्या मंडपातील हौदात किंवा महापालिकेच्या फिरत्या हौदातच श्रींचे विसर्जन करणार आहे. मंडळाचे मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच विसर्जन होईल. बाहेरील नागरीकांना तेथे परवानगी नसेल. यादृष्टीने मंडळांना सांगितले आहे. नागरीकांना श्रींचे दर्शन व्हावे, यासाठी सर्व मंडळांनी त्यांच्या लिंक तयार केल्या असल्याने नागरीकांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे. मानाच्या गणपती परिसरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना बंदी राहणार आहे.’

विसर्जनाच्या दिवशी गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक पोलिस ठाण्यांबरोबरच गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक यांचा बंदोबस्त राहणार आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व सहआयुक्त हे बंदोबस्तावर देखरेख ठेवतील. त्यांच्यासोबत एक राखीव पोलिस दलाचे पथक असेल. मानाच्या गणपतीच्या विसर्जन वेळा ठरल्यामुळे त्या ठिकाणी बंदबोस्त पुढील गणपती विसर्जनासाठी वापरता येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून बंदोबस्त लावला जाणार आहे. सीसीटीव्हीद्वारे सर्व ठिकाणी नजर ठेवली जात आहे. पोलिसांच्या मदतीला एक हजार विशेष पोलिस अधिकारी, साडेचारशे होमगार्ड असणार आहेत, असे डॉ. शिसवे यांनी सांगितले.

मानाचे गणपती व प्रमुख मंडळे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने तेथे नागरीकांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे पोलिसांकडून प्रमुख रस्ते, चौक, गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिक रहिवासी, रुग्ण, विद्यार्थी, अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्तींना पोलिस सहकार्य करतील. मात्र अन्य नागरीकांना मध्यवर्ती येऊ नये, घरूनच ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहनही डॉ. शिसवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading