गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व दुकाने बंद राहणार

पुणे : अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच खडकी, देहू व पुणे कॅन्टॉनमेंट या तिन्ही कॅन्टॉनमेंट परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी हॉटेल व रेस्टॉरंट तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद असणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व  पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज ही माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थिती संदर्भातील आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, गणपती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे.

परिस्थिती कायम राहिल्यास 2 ऑक्टोबरला नवा निर्णय 

शहरात करोना रुग्णांचे प्रमाण कमी असलेतरी तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी अद्यापही काही काळ दक्षता घेण्याची गरज आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी गर्दी झाल्याने कोविड संसर्ग पसरण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे आणि आसपासच्या परिसरात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील कोरोना मृत्युदर कमी झाला असून रुग्ण वाढ ही कमी झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास 2 ऑक्टोबरला नवा निर्णय घेऊ, असे ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस सांगू?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेल्या ‘आजी, माजी आणि भावी सहकारी’, या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस सांगू? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय कसं चालवायचं, समस्या काय याच्याच चर्चा होतात. आज पूर्णपणे बहुमत महविकास आघाडीकडे आहे.’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: