११वी ‘भारतीय छात्र संसद’ २३ सप्टेंबर पासून ऑनलाइन
पुणे : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसांच्या भारतीय छात्र संसदेेचे दि.२३ ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाइन आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे अकरावे वर्ष आहे.
भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे. ११व्या छात्र संसदेचे ऑनलाइन उद्घाटन गुरुवार, दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता होईल. या समारंभासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे प्रमुख पाहुणे असतील. सन्मानीय अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रुपाला हे असतील. खासदार तिरूची शिवा, खासदार निरज शेखर, खासदार माणिकम तगोरे, माजी मुख्य निवडूक आयुक्त डॉ. नसिन झैद हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर व प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहतील. झारखंडचे राज्यपाल रमेश बायस हे अध्यक्षस्थानी असतील.
समारोप मंगळवार, दि.२८ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होईल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया हे प्रमुख पाहुणे असतील. खासदार कुमार केतकर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री डॉ.एम. विरप्पा मोहली, कम्यूनिस्ट पक्षाचे प्रकाश करात आणि सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्वॉरमेंटच्या संचालिका आणि पर्यावरणवादी सुनीता नारायण हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्ष स्थानी देवेंद्र फडणवीस हे असतील.
