fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यापीठांमध्ये सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची आवश्यकता – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर  : कधीकाळी अध्यात्मिक कौशल्याचे प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई देशांमध्ये सुरक्षाविषयक शस्त्रनिर्मिती व आधुनिक तंत्रज्ञानाची स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी विद्यापीठांनीही संरक्षण क्षेत्रातील सुरक्षाविषयक अभ्यासक्रमाला सुरुवात करणे गरजेचे आहे. नागपूर विद्यापीठाने या संदर्भात पाऊल टाकल्याचा मला आनंद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात बुधवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आशियाई देशांमध्ये इतरांचे अस्तित्व नष्ट करून केवळ आपलेच अस्तित्व जगमान्य व्हावे इथपर्यंत कडवी संरक्षण विषयक स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे रक्षा, आंतरिक कौशल्य या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ निर्मितीची आवश्यकता आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भविष्यात गुंतवणूक होणाऱ्या नागपूर सारख्या शहरात यासाठी अभ्यासक्रम सुरू होतो, ही अभिमानास्पद बाब  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महापौर दयाशंकर तिवारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, ग्रुप कॅप्टन ग्रुप कमांडर एनसीसी एम. कलीम,अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर, डॉ. प्रशांत माहेश्वरी, डॉ. दत्तात्रय वाटमोडे उपस्थित होते. यावेळी सन्मानचिन्ह देऊन कुलपती व अन्य मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

नागपूर विद्यापीठातील या अभ्यासक्रमाने मनुष्यबळ निर्मितीला वाव मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या या परिसरात पुढील काळात संरक्षण विषयक निर्मिती क्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. कौशल्ययुक्त मणुष्यबळासोबतच संरक्षण तज्ज्ञही विद्यापीठात घडावे, अभियंते, तंत्रज्ञ, अभ्यासकही निर्माण व्हावे, प्रधानमंत्र्यांनी देखील हीच अपेक्षा  व्यक्त केली असल्याचे ते म्हणाले.

विद्यापीठाला निधीची कमी पडू देणार नाही. यासाठी गरज पडल्यास देश-विदेशातून निधी उभारल्या जाऊ शकतो. मात्र देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणे हे अतिशय आवश्यक असून त्यादृष्टीनेच वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जात आहे. एकूण 11 नवे अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठ सुरू करीत आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading