Saturday, September 26, 2026
Latest NewsMAHARASHTRA

राज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयम् वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असतो. अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्टअखेर १ लाख ११ हजार ०८३ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असेही  मलिक यांनी सांगितले.

मलिक म्हणाले, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in  हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या महास्वयम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ०९१ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मलिक यांनी सांगितले.

मुंबईत ऑगस्टमध्ये ६ हजार १९० बेरोजगारांना रोजगार

मलिक म्हणाले, माहे ऑगस्ट २०२१ मध्ये विभागाकडे ३९ हजार ५७४ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ९ हजार २१६, नाशिक विभागात ६ हजार १८०, पुणे विभागात १० हजार ९८०, औरंगाबाद विभागात ८ हजार १०९, अमरावती विभागात २ हजार ७४० तर नागपूर विभागात २ हजार ३४९ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. माहे ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १७ हजार ३७२ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार १९०, नाशिक विभागात २ हजार १६८, पुणे विभागात ४ हजार ६२९, औरंगाबाद विभागात ३ हजार ७३८, अमरावती विभागात ४४९ तर नागपूर विभागात १९८ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading