fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

भोर,वेल्हा, मुळशी भागात ट्रॉमा सेंटर सुरू करा, आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि वेल्हा तालुक्यातील नागरिकांसाठी नसरापूर या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटर व मुळशी तालुक्यासाठी पिरंगुट येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

टोपे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देत शिवतरे यांनी त्यांच्याशी तिन्ही तालुक्यातील आरोग्य सेवेसंदर्भात सविस्तर चर्चा केली. भोर तालुक्यातील हिर्डोशी, भूतोंडे व उपकेंद्र रायरी; वेल्हा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पानशेत व उपकेंद्र दापोडे या ठिकाणी आरोग्य केंद्र व उपकेंद्राची सुमारे ८० टक्के बांधकामे झाली आहेत. तथापि येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची अद्याप नेमणूक झाली नाही. त्यामुळे रुग्णसेवेत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे येथे लवकरात लवकर कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी केल्याचे शिवतारे यांनी सांगिले.

याशिवाय भोर तालुक्यातील नसरापूर या मध्यवर्ती ठिकाणी भोर व वेल्हा तालुक्यातील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटर उभारावे हा मुद्दा आरोग्यमंत्र्यांकडे मांडला. यासह मुळशी तालुक्यासाठी पिरंगुट येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारावे अशी मागणी केली. या भागातून रायगड किल्ला आणि जिल्ह्यात अन्यत्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. शिवाय पिरंगुट हे मुळशी तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे येथे रुग्णालय होणे गरजेचे असल्याचे त्यांना टोपे यांच्या लक्षात आणून दिले.

आरोग्य मंत्र्यांकडून कार्यवाहीचे आश्वासन
यासंदर्भातील ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले असून त्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यताही देण्यात आल्याचे शिवतरे यांनी सांगितले. आपले म्हणणे टोपे यांनी सविस्तर ऐकून घेत कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे रणजित शिवतरे यांनी सांगितले. त्यांनी आरोग्य सचिवांना लागलीच याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading