भारतीय टेनिस व्हॉलीबॉलमहासंघास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता

पुणे : भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. यानिमित्त महासंघाच्या पुढील वाटचाली संदर्भात रविवार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला एकूण ३० राज्याच्या राज्य संघटनेचे सचिव व अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक आणि भारतीय  टेनिस व्हॉलीबॉल महासंघाचे संस्थापक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भारतीय टेनिस व्हॉलीबॉल संघाचे उपाध्यक्ष सुरेश रेड्डी, कोषाध्यक्ष धर्मेंद्र सिंह जडेजा, भगवान पेद्दावाड, महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष गणपतराव बालवडकर, तांत्रिक समिती अध्यक्ष प्रफुल्लकुमार बनसोड उपस्थित होते. टेनिस आणि व्हॉलीबॉल या दोन खेळांच्या मधून टेनिस व्हॉलीबॉल या खेळाची निर्मिती झाली.  डॉ.व्यंकटेश वांगवाड यांनी टेनिस व्हॉलीबॉल हा खेळ सातासमुद्रापार नेला आहे. 

१९८३ मध्ये डॉ.व्यंकटेश वांगवाड यांनी या खेळाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर १९९३ मध्ये विविध शहरांमध्ये या खेळाची प्रात्यक्षिके झाली. जानेवारी २००० मध्ये क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व क्रीडाप्रेमींची बैठक पुण्यात घेण्यात आली, त्यावेळी या खेळाला मान्यता दिली गेली आणि भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर विविध राज्यांच्या संघटना आणि जिल्हा संघटनांची निर्मिती झाली आणि आज भारतात निर्मिती झालेल्या टेनिस व्हॉलीबॉल या खेळास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची देखील मान्यता मिळाली आहे.

डॉ.व्यंकटेश वांगवाड म्हणाले, आजपर्यंत  टेनिस व्हॉलीबॉल खेळाच्या २२ राष्ट्रीय  स्पर्धा झाल्या असून जवळपास २० ते २५ राज्ये राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होतात. तसेच २०१३ साली या खेळास स्कूल फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता मिळाली. राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मान्यतेने पहिली शालेय राज्य टेनिस  व्हॉलीबॉल स्पर्धा परभणी  जिल्ह्यात  झाली.  आजपर्यंत सहा शालेय राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील १५ देशांत या खेळाचा प्रसार व प्रचार करण्यात आला आहे. असेही डॉ.वांगवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: