जनसंपर्क कार्यालये चळवळीची केंद्रे व्हायला हवीत – चंद्रकांत पाटील

पुणे : जनसंपर्क कार्यालय सुरु करणे सोपे आहे. परंतु सदासर्वदा सुरु ठेवणे तितकेच अवघड आहे. माणसांसाठी काम करायला सुरुवात केल्यानंतर माणसांचा कंटाळा येता कामा नये. या कार्यालयामधून जनतेचे प्रश्न सोडवायला हवेत. त्यासाठी सतत पाठपुरावा केला पाहिजे. हे सर्व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे करायला हवे. जनसंपर्क कार्यालये हि चळवळीची केंद्रे व्हायला हवीत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
भाजप शिवाजीनगर भागाचे अध्यक्ष रविंद्र साळेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन दीप बंगला चौक, कॅनाल रस्ता येथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप पुणेचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस दत्ता खाडे, महिला शहराध्यक्ष अपर्णा पाटील, नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे, गणेश घोष, रविंद्र साळेगावकर यावेळी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, अनेक वर्षे सातत्याने भारतीय जनता पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते पुण्यात आहेत. ते सतत पक्षाचा विचार करुन काम करीत असतात. भाजप हा जिवंत कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला गेला पाहिजे. चुकीच्या गोष्टी थांबविण्यासाठी संघर्ष व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
रविंद्र साळेगावकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम करीत असल्याने लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा नेहमीच मिळते. लोकांची सेवा करणारे लोक संघात आहेत. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शिवाजीनगर भागातील लोकांसाठी अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येणार आहे. याशिवाय ऑनलाइन तक्रार निवारण अॅप देखील तयार करण्यात आले आहे. यामाध्यमातून फक्त क्यूआर कोड स्कॅन करुन नागरिकांना ऑनलाईन समस्या नोंदविता येणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: