‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची सकाळी १०.२३ वाजता प्रतिष्ठापना

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षानिमित्त गणेश चतुर्थीला शुक्रवार, दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री व वेदमूर्ती मिलींद राहुरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा मंदिरामध्ये संपन्न होईल. गणेशोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक आरास करण्यात येणार आहे.ॠषीपंचमीनिमित्त आॅनलाईन अथर्वशीर्ष पठण
यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ट्रस्टने आॅनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ऋषीपंचमीनिमित्त शनिवार, दिनांक ११ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा आॅनलाईन पद्धतीने होईल. ट्रस्टच्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम याद्वारे या उपक्रमाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

दि. १० ते १९ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी महागणेश याग आणि दुपारी १ ते सायंकाळी ६ पर्यंत लक्षावर्तन, होम-हवन हे वेदमूर्ती नटराज शास्त्री करणार आहेत. तर, ब्रह्मणस्पती सुक्त पारीजात वेदमूर्ती धनंजय घाटे व ब्रह्मवृंद करणार आहे. दिनांक १७ सप्टेंबर रोजी ६ वेदमूर्ती मधुकर जांभेकर गुरुजी मंत्रजागर करणार आहेत. उत्सवकाळात श्रीं ची आरती आॅनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी ७.३० व रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येईल.

श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे http://www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: