तुळशीबाग गणपती मंडळातर्फे यंदा गणेशोत्सवात ‘शिल्पकारांचा गणपती’ ही विशेष आॅनलाईन मालिका

पुणे : गणेशोत्सवात सन १९५२ पासून गाजलेल्या १० देखाव्यांची सजावटीची माहिती तरुण वर्गाला मिळावी, याकरीता मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे शिल्पकारांचा गणपती या विशेष मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवात दहा दिवस आॅनलाईन स्वरुपात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ज्येष्ठ विश्वस्त विवेक खटावकर, अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम आदी उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष म्हणून विकास पवार यांची निवड करुन त्यांचा खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोरोनाच्या परिस्थितीत उत्सवावर निर्बंध असताना घरबसल्या गणेशभक्तांना त्याचा लाभ घेता येणार आहे. तसेच या देखाव्यांवर वर आधारित एक प्रश्नमंजूषा पण होणार आहे. नानाविध वैशिष्ट्यांनी तुळशीबाग गणपती प्रसिद्ध आहे. सन १९५२ सालापासून तुळशीबाग मंडळाची सजावट कलामहर्षी कै. डी. एस. खटावकर सर करत होते. कै.खटावकर सर अभिनव कला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवेत होते.

त्यावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल ज्ञान होण्यासाठी गणेशोत्सवात सजावटीचे काम करण्याची संधी द्यायचे. ते विद्यार्थी आता त्यांच्या क्षेत्रात अत्युच्च शिखरावर आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार मुरली लाहोटी,शिल्पकार विजय दिक्षित, पुरातत्व खात्यातून निवृत्ती झालेले विजय विश्वासराव, इंटेरिअर डिझाईनर अजय पंचमतिया, प्रसिद्ध चित्रकार शाम भूतकर असे अनेक कलाकारांची जडणघडण या तुळशीबागेच्या मंडळात झाली. त्यावेळी झालेल्या सजावटीची वैशिष्ट्ये त्या सजावटीत काम करणा-या कलावंताकडून गणेशभक्तांना ऐकता येणार आहे. याशिवाय आॅनलाईन आरती, अभिषेक, दर्शनाची सोय पण करणार आहे तरी भक्तांनी घरबसल्या या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: