पुणेकरांनी गणेशोत्सव काळात आॅनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद घ्यावा, प्रमुख गणपती मंडळांचे आवाहन

पुणे : मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव सर्वांनीच साधेपणाने साजरा केला होता. तसेच नागरिकांना, भक्तांना आॅनलाईन माध्यमातून दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे, अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि आॅनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी आज  पत्रकार परिषदेत केले.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन पुणेकरांना आवाहन केले आहे.

श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सपकाळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन, नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी, विनायक कदम, सौरभ धोकटे आदी यावेळी उपस्थित होते.

खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. त्याला पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त माधव जगताप उपस्थित होते. शासन व प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करून गणेशोत्सव साजरा करताना दोन कमानी व रनिंग मांडवाला परवानगी देण्याबाबत गिरीश बापट यांनी प्रशासनाशी चर्चा केली. पुण्यातील मंडळे सर्व नियम पाळून आॅनलाईन दर्शनाला प्राध्यान्य देणार आहेत.

यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सहाय्यासाठी पुण्याच्या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुणेकरांनी देखील स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी, असेही मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: