पुणे शहर कॉंग्रेस कमिटी आणि जेधे फाऊंडेशनतर्फे २५० रिक्षाचालकांना सीएनजी कुपन वाटप

पुणे : पुणे शहर कॉंग्रेस कमिटी आणि जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशनतर्फे पुण्यातील २५० रिक्षाचालकांना प्रत्येकी १५० रुपयांचे सीएनजी कुपन वाटप आणि ४० कष्टक-यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. फडगेट पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या जेधे मॅन्शन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, रोहित टिळक, विरेंद्र किराड, माजी महापौर कमल व्यवहारे, कसबा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण करपे, गौरव बोराडे, शिवराज जेधे, सुलक्षणा नाईक, संतोष वाडेकर, आयोजक कान्होजी जेधे उपस्थित होते. कान्होजी जेधे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अ‍ॅड.अभय छाजेड म्हणाले, जेधे घराण्याला ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्य चळवळीला सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम जेधे घराण्याने केले. कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना मदत करायला हवी. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी आपण काळजी घ्यायला हवी.

कमल व्यवहारे म्हणाल्या, जेधे घराण्याला मोठा सामाजिक व राजकीय वारसा लाभला आहे. जेधे मोरे आणि गाडगीळांची कॉंग्रेस असे म्हटले जाते, त्यांचा इतिहास कधीही विसरला जाणार नाही. जेधे घराण्याचे कार्य त्यांची पिढी पुढे नेत आहे. कोविडमुळे रिक्षाचालक मागील दोन वर्षांपासून संकटात आहेत. त्यामुळे त्यांना मदत करायला पुढाकार घ्यायला हवा.

कान्होजी जेधे म्हणाले, रिक्षाचालक मागील दोन वर्षांपासून आर्थिक संकटात आहेत. त्यांना मदतीचा हात देण्याकरीता सीएनजी कुपन देण्यात आले. त्यासोबतच पुणे शहर, प्रदूषणमुक्त ठेवण्याकरीता सीएनजीचा संदेश देण्यात आला. स्वच्छता कर्मचारी हे संपूर्ण शहर स्वच्छ ठेवतात, त्यामुळे त्यांचा सन्मान आपण करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. साईराज नाईक, ओंकार कदम, ऋषिकेश झंवर, मंगेश कोंढरे, अभिषेक तुळसुळकर व सर्व मित्र परिवाराने कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. सुरेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: