Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सीईटीचे वेळापत्रक जाहीर; १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार परीक्षा

नवीन शैक्षणिक वर्ष 2 नोव्हेंबरपासून सुरु होणार 

मुंबई : शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्य सीईटी कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सामंत म्हणाले, सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी २२६ केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेन तिकीटासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवावे, असेही श्री.सामंत यांनी सांगितले. ८६ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र मिळणार आहेत व १४ टक्के विद्यार्थ्यांना उर्वरित विकल्पानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करण्यात येईल व अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरु करण्यात येईल.

सीईटी परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे

मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन  – दि. १५ सप्टेंबर २०२१

मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी – दि. 16 ,17 व 18 सप्टेंबर 2021

बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स – दि. 20 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021दि.

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (5 वर्ष), बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन -दि. 3 ऑक्टोबर 2021

बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन – दि. 4,5,6 आणि 7 ऑक्टोबर 2021

बॅचलर ऑफ लॉ (3 वर्ष ) – दि. 4 व 5 ऑक्टोबर 2021

बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल-  दि. 6 व 7 ऑक्टोबर 2021

बॅचलर ऑफ फाईन आर्ट – दि. 9 व 10 ऑक्टोबर 2021

नवीन शैक्षणिक वर्ष 2 नोव्हेंबर पासून 

या सर्व परीक्षांचे निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22  दोन नोव्हेंबरपासून सुरु होईल, असे सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

‘त्या’ शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा कमी केली

खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी ‘गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे’ या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून रु.8 लाख इतकी करण्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. या पूर्वी या शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा रु. 20 लाख इतकी होती. उत्पन्न मर्यादा कमी केल्याने आता अधिक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा फायदा घेता यईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading