युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील टक्का वाढण्याची गरज – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे :आज लोकसंख्येत १८ ते १९ वयातील युवा साडेतीन टक्के असले तरी प्रत्यक्ष मतदार यादीमध्ये मात्र केवळ एक टक्का युवक नोंदणी आहे; त्यामुळे पुढील काळात युवकांचा मतदार यादीतील टक्का वाढविण्याबरोबर त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्ये रुजविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रधान सचिव आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाही मूल्यांची रुजवण आणि शिक्षकांची भूमिका’ या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठात केले होते. त्यावेळी श्रीकांत देशपांडे बोलत होते. राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, डॉ. दीपक पवार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिक्षक दिनानिमित्त डॉ. श्रुती तांबे, डॉ. राजेश्वरी देशपांडे आणि डॉ. सुहास पळशीकर या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

देशासमोर कोणतीही समस्या निर्माण झाली तर त्याचे मूळ शिक्षणात शोधावे लागते असे सांगून श्रीकांत देशपांडे म्हणाले, स्वातंत्र्याच्या मूल्यांवर होणारे अतिक्रमण, निवडणुकांमधील भ्रष्टाचार, राजकीय क्षेत्रातील गुन्हेगारीकरण आदी समस्यांबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचे काम शिक्षणातून झाले पाहिजे. निवडणूक प्रक्रियेच्या मूळ प्रवाहात युवकांचा समावेश झालाच नाही तर या समस्या गंभीर होतील. प्रवास मोठा असला तरी पुणे विद्यापीठाने लोकशाही, संविधान, निवडणुका आदी विषयांचे महत्व सांगणारे विविध लघु अभ्यासक्रम सुरू करून या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे.

ते पुढे म्हणाले, १९ ते ३० वय असलेल्या युवकांचे लोकसंख्येमध्ये प्रमाण १८ टक्के आहे, मात्र मतदार नोंदणीत केवळ १३ टक्के युवक आहेत. या युवकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यात त्याविषयी साक्षरता निर्माण करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ, विविध स्पर्धा, प्रश्नोत्तरे, लोकशाही गप्पा, मतदार नोंदणी कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणात नागरिकशास्त्राचा विषय शिकवताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संबंधित ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत नेऊन प्रात्यक्षिकाची जोड देऊन शिकवल्यास नक्कीच लोकशाही मूल्यांचे महत्व लक्षात येईल. 

Leave a Reply

%d bloggers like this: