लिंग समानतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी लघुपटनिर्मिती व गेमिंग यांसारखी माध्यमे प्रभावी

पुणे : लिंग समानता या विषयावर चर्चा व प्रभावी जनजागृती करायची असेल तर चित्रपट, लघुपट निर्मिती, गेमिंग क्षेत्र यांसारख्या युवा पिढीला जवळच्या वाटणा-या क्षेत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

भारत व बांग्लादेश या दोन देशांमधील विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व बौद्धिक विषयांबरोबरच लैंगिक स्पेक्ट्रमच्या पुढे जात पुरुषत्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन व सद्य परिस्थितीवर चर्चा करण्याच्या हेतूने दोन्ही देशांमधील ग्योथे इंस्टिट्युट्सच्या वतीने ‘एम थ्री : मॅन, मेल, मॅस्क्युलिन’ या दोन दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ही मते मांडण्यात आली. सदर परिषदेत झालेल्या दोन विविध कार्यक्रमांमध्ये जर्मनीमधील चित्रपट निर्मात्या असलेल्या केर्स्टिन रिकरमान व पुण्यातील नव माध्यमांशी संबंधित कलाकार अनोखी शाह यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी आपल्या लघुपट निर्मितीबद्दल बोलताना केर्स्टिन रिकरमान म्हणाल्या, “लिंग समानता हा विषय आपल्याकडे केवळ माध्यमांमध्ये चर्चिला जातो, पण घराघरांमध्ये त्यावर चर्चा होत नाही. हेच लक्षात घेत युवा पिढीचा दृष्टीकोन बदलण्याच्या हेतूने आम्ही ग्लोकल फिल्मच्या माध्यमातून भारत बांग्लादेशाबरोबर माली या देशातील १४ ते १८ वयोगटातील युवक युवतींसाठी लघुपट निर्मितीच्या कार्यशाळांचे आयोजन केले. युवक व युवतींचे वेगवेगळे गट  बनवीत त्यांना लघुपट निर्मितीचे साहित्य, चित्रीकरण पद्धती, एडीटिंग आदी विषयांची माहिती देत त्यांच्याकडून लघुपट बनवून घेण्यावर भर दिला. या वेळी देण्यात आलेले विषय हे लिंग समनतेशी संबंधित होते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान युवक युवतींमध्ये विचारपरिवर्तन होण्यास मदत झाल्याचे आमच्या निदर्शनास आले.”

या माध्यमातून समाजात लिंग समानता कशी आणता येईल, त्यासाठी आपण काय करू शकतो, असे प्रश्न युवा पिढीला पडले. अशा पद्धतीने लघुपट निर्मितीसारख्या माध्यमाद्वारे आम्ही हा विषय पोहचू शकलो. लघुपट, चित्रपट निर्मिती ही माध्यमे आज सामान्य नागरिकांचा आवाज बनू शकत आहेत. इतकेच नव्हे तर यांद्वारेच आजवर अनेक नागरिकांचा आवाज आम्ही जगभर पोहोचवीत आहोत याचा आनंद असल्याचे रिकरमान यांनी नमूद केले. लिंग समानता यांवर बनविलेले काही लघुपट देखील या दरम्यान दाखविण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: